अजब आजारामुळे कापून घेतली बोटं
बालपणापासून घाबरवतात बोटं
अनेकदा मोठमोठ्या डॉक्टरांकडे विचित्र रुग्ण येत असतात. युनिव्हर्सिटी लावलमध्ये मानसोपचार विभागाच्या डॉ. नादिया नादेउ यांनी अलिकडेच एका अशा अज्ञात रुग्णाबद्दल केस रिपोर्ट प्रकशित केला आहे. या इसमाला अजब समस्या होती. त्याला दोन्ही हातांच्या बोटांचीच भीती वाटत होती. ही बोटं आपल्या शरीराचा हिस्सा नसल्याचे त्याला बालपणापासून वाटायचे. या बोटांपासून मुक्ती मिळविण्याची त्याची इच्छा होती.
स्वत:च्या पूर्ण जीवनात या विचारांमुळे त्याला वेदना, चिडचिडेपणा, सातत्याने अस्वस्थ वाटायचे. स्वत:ची दोन बोटं सडत आहेत किंवा जळत आहेत अशी स्वप्नं त्याला पडत होती. परंतु रुग्णाने संकोचापोटी स्वत:च्या बोटांविषयीची समस्या कुटुंबीयांना कधीच सांगितली नव्व्हती. परंतु डॉक्टरांनी दोन्ही बोटं कापून टाकावीत अशी त्याची इच्छा होती.
बोटांसोबत जगणं अवघड
एका सॉ मिलमध्ये काम करताना त्याने स्वत:च्या बोटांना कापण्यासाठी एक छोटी गिलोटिन तयार करण्याचाही विचार केला होता. स्वत:ला नुकसान पोहोचविणे एक सुरक्षित उपाय नसल्याचे त्याला कळले होते. याचा प्रभाव नातेसंबंध, प्रतिमा आणि आरोग्यावर पडू शकला असता. परंतु तो पुढील जीवनात या बोटांसोबत जगण्याची कल्पना देखील करू शकत नव्हता असे डॉ. नादेउ यांनी म्हटले आहे.
अन्य उपचार ठरले निरुपयोगी
या व्यक्तीच्या मेंदूचे इमेजिंग सामान्य दिसून येत होते, याचमुळे त्याला कॉग्निटिव्ह बिहेव्हियरल थेरपी, अँटीडिप्रेसेंट्स, अॅँटीसायकॉटिक्स आणि एक्स्पोजर थेरपी यासारख्या बिगर-आक्रमक उपचारांचे पर्याय देण्यात आले, परंतु त्यातील काहीच उपयुक्त ठरले नाही. सायकेट्रिक इव्हॅल्युशनंतर रुग्णाला ऑर्थोपेडिक विभागात पाठविण्यात आले, जेथे रुग्णाला मदत करण्यासाठी त्याची दोन बोटं हटविण्याचा निर्णय घेण्यात आला.
आाता निवांत जगतोय
या इसमाला बॉडी इंटिग्रिटी आयडेंटिटी डिसऑर्डर होता. त्याची बोटं कापण्यात आली आणि शस्त्रक्रियेनंतर भावनात्मक संकटासोबत त्याला वाईट स्वप्नं पडणंही बंद झाले. त्याचा संताप कमी झाला आणि कुटुंब आणि वर्कलाइफमध्ये सुधारणा झाली. स्वत:ची बोटं कापून घेण्याचे त्याला कुठलेच दु:ख नाही. आता तो बॉडी इंटिग्रिटी आयडेंटिटी डिसऑर्डरशी संबंधित सर्व लक्षणांच्या उपायांसोबत स्वत:च्या बोटांविषयी त्रास देण्याचा चिंतेपासून मुक्त जगत आहे