फिनेस्टा टेनिस स्पर्धा शनिवारपासून
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
येथील दिल्ली लॉन टेनिस संघटनेच्या टेनिस कोर्टवर 29 व्या फिनेस्टा खुल्या राष्ट्रीय चॅम्पियनशीप टेनिस स्पर्धेला शनिवार दि. 28 सप्टेंबरपासून प्रारंभ होणार आहे. ही स्पर्धा 12 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. या स्पर्धेचा ड्रॉ काढण्यात आला असून भारताच्या विष्णू वर्धन, टॉप सिडेड प्रज्वल देव आणि विद्यमान विजेती रस्मिका बी. प्रमुख आकर्षण राहतील.
या स्पर्धेत भारताचे अव्वल टेनिसपटू सहभागी होत आहेत. सदर स्पर्धा वरिष्ठ गटात तसेच 14, 16, 18 वर्षांखालील मुले आणि मुलींच्या गटामध्ये खेळविली जाणार आहे. या स्पर्धेच्या पहिल्या आठवड्यात पुरूष आणि महिला, 18 वर्षांखालील मुले आणि मुली, एकेरी आणि दुहेरीचे सामने खेळविले जातील. या स्पर्धेत पात्र फेरीतील सामने 28 आणि 29 सप्टेंबरला होतील. त्यानंतर प्रमुख ड्रॉतील सामन्यांना 30 सप्टेंबरपासून प्रारंभ होईल. प्रमुख ड्रॉमधील सामने 30 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर दरम्यान होतील. 14 आणि 16 वर्षांखालील मुले आणि मुलींच्या विभागातील सामने 6 ते 12 ऑक्टोबर दरम्यान होणार आहेत. या स्पर्धेसाठी एकूण बक्षीसांची रक्कम 21.55 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. 14 आणि 16 वर्षांखालील मुले आणि मुलींच्या विभागातील एकेरीच्या विजेत्या आणि उपविजेत्या टेनिसपटूंना डीसीएम श्रीराम उद्योग समुहाचे प्रमुख अजय श्रीराम यांनी 25 हजार रुपयांची शिष्यवृत्ती जाहीर केली आहे.