पशुखाद्याचे पर्यायी स्रोत शोधणे मुख्य आव्हान!
दिव्या कुमार गुलाटी यांचे प्रतिपादन
प्रतिनिधी/ पणजी
सध्या पशुधन क्षेत्रासमोरील सर्वात मोठे आव्हान कच्च्या मालाच्या घटत्या पुरवठ्यासह पशुखाद्याची उपलब्धता आहे. त्यामुळे चारा उत्पादनासाठी पर्यायी कच्चा माल शोधण्यावर आमचा भर आहे. कंपाऊंड लाईव्हस्टॉक फीड मॅन्युफॅक्चर्स असोसिएशच्या 65 व्या परिसंवादाचा उद्देश शेतकरी आणि पशुधन उत्पादकांसाठी ‘फार्म-टू-फोर्क’ दृष्टिकोनावर आधारित व्यासपीठ विकसित करणे आहे, ज्यासाठी केंद्र सरकारशी चर्चा केली जाईल, अशी माहिती केंद्र सरकारच्या कंपाऊंड लाईव्हस्टॉक फीड मॅन्युफॅक्चर्स असोसिएशचे नवनिर्वाचित अध्यक्ष दिव्या कुमार गुलाटी यांनी दिली.
बार्देश तालुक्यातील हॉटेल नोवोटेल गोवा रिसॉर्ट या ठिकाणी केंद्र सरकारच्या कंपाऊंड लाईव्हस्टॉक फीड मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनतर्फे (सीएलएफएमए) आयोजित करण्यात आलेल्या 65 व्या राष्ट्रीय संमेलनाच्या समारोप सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते.
देशातील पशुधन उद्योग सुधारण्यासाठी कार्यरत असलेल्या केंद्र सरकारच्या कंपाऊंड लाईव्हस्टॉक फीड मॅन्युफॅक्चर्स असोसिएशने (सीएलएफएमए) आयोजित केलेल्या 65 व्या राष्ट्रीय परिसंवादाच्या दुसऱ्या दिवशी 57 व्या एजीएममध्ये दिव्या कुमार गुलाटी यांची नवीन अध्यक्ष म्हणून एकमताने निवड केली.
दिव्या कुमार गुलाटी यांनी पदाचा कार्यकाळ पूर्ण केलेले माजी अध्यक्ष सुरेश देवरा यांची जागा घेतली आहे. गुलाटी यांना हेल्थकेअर, न्यूट्रिशन आणि फूड इंडस्ट्रीजमध्ये 30 वर्षांहून अधिक काळचा व्यापक अनुभव आहे. पशुधन उद्योगात नाविन्यपूर्ण आणि शाश्वत उपायांची ओळख करून देण्यात आणि स्थापित करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. नेचर टेक्नॉलॉजीचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून गुलाटी हे 1990 च्या दशकात भारतात कोळंबी शेतीमध्ये प्रोबायोटिक संस्कृती आणण्यात आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची ओळख करून देण्यात अग्रेसर आहेत. आयुर्वेदिक हर्बल घटकांच्या मिश्रणातून त्यांनी अनेक नाविन्यपूर्ण उत्पादनेही विकसित केली आहेत. कुक्कुटपालन आणि दुग्धव्यवसायासाठी त्यांच्या नवीन दृष्टिकोनाने पशुधन उद्योगासाठी जबरदस्त परिणाम प्राप्त केले आहेत.
गोव्यात घेण्यात आलेल्या राष्ट्रीय परिसंवादात या राष्ट्रीय परिषदेत पशुधन उद्योगातील दिग्गज, भारत सरकारचे तज्ञ आणि विविध भागधारकांसह 400 हून अधिक तज्ञ सहभागी झालेल्या नागरिकांनी आपले अनुभव कथन केले.
केंद्र सरकारच्या कंपाऊंड लाईव्हस्टॉक फीड मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनचे अध्यक्ष दोन वर्षांसाठी निवडले जातात. त्यामुळे या राष्ट्रीय परिसंवादात भारताच्या सीएलएफएमए नवीन कार्यकारिणीही जाहीर करण्यात आली आहे. उपसभापतीपदी नवीन पशुपार्थी, सुमित सुरेखा, अभय पारनेरकर, अभय शहा यांची निवड झाली आहे. निसार एफ. मोहम्मद यांना सचिव आणि आर.राम कुट्टी यांना खजिनदारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. याशिवाय बलराम भट्टाचार्य यांना पूर्व विभागाचे अध्यक्ष, डॉ. सैकत साहा यांना पश्चिम विभागाचे अध्यक्ष, डॉ. देवेंद्र हुडा यांना उत्तर विभागाचे अध्यक्ष आणि सरवणन यांना भारताच्या सीएलएफएमएचे दक्षिण झोन अध्यक्ष बनवण्यात आले आहे.