दुसरा कुणी चांगला उमेदवार शोधा!
राष्ट्रपतिपदाची निवडणूक ः गोपाळकृष्ण गांधी यांचा उमेदवारीस नकार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
महात्मा गांधी यांचे नातू गोपाळकृष्ण गांधी यांनी विरोधी पक्षांच्या वतीने राष्ट्रपतिपदाचा उमेदवार होण्यास नकार दिला आहे. संयुक्त विरोधी पक्षांकडून माझ्या नावाचा प्रस्ताव पुढे करण्यात आल्याने आभारी असल्याचे म्हणत गांधी यांनी स्वतःच्या उमेदवारीस नकार दिला आहे. माझ्यापेक्षा अधिक चांगला राष्ट्रपती ठरेल अशा अन्य व्यक्तीच्या नावाचा विचार करा असे त्यांनी म्हटले आहे. यापूर्वी 15 जून रोजी विरोधी पक्षांच्या बैठकीत शरद पवार, फारुख अब्दुल्ला यांच्या नकारानंतर गांधी यांचे नाव समोर आले होते.
विरोधी पक्षाच्या काही नेत्यांनी गोपाळकृष्ण गांधी यांच्याशी फोनवरून संपर्क साधत राष्ट्रपतिपदाच्या उमेदवारीची ऑफर दिली होती. यापूर्वी 2017 मध्ये एम. व्यंकय्या नायडू यांनी विरोधात त्यांनी उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक लढविली होती. परंतु त्यांना पराभव पत्करावा लागला होता. गोपाळकृष्ण गांधी हे यापूर्वी राजनयिक अधिकारी राहिले आहेत. याचबरोबर पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून त्यांनी 2004-09 पर्यंत काम पाहिले आहे. याचबरोबर दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंकेत भारतीय उच्चायुक्त म्हणून त्यांनी काम केले आहे.
पवार, अब्दुल्लांचा नकार
राष्ट्रपती उमेदवारावरून विरोधी पक्षांमध्ये अद्याप कुठलीच सहमती झालेली नाही. मागील आठवडय़ात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँगेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी दिल्लीमध्ये विरोधी पक्षांची बैठक बोलाविली होती. यात काँग्रेसह 17 पक्षांचे नेते सामील झाले होते. बैठकीत काही नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना निवडणुकीत उभे करण्याचा प्रस्ताव मांडला होता. परंतु पवार यांनी उमेदवारीला नकार दिला होता. आपण अद्याप सक्रीय राजकारणात राहू इच्छितो असे त्यांनी म्हटले हेते. याचबरोबर नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनीही उमेदवारीला नकार दिला आहे. अशा स्थितीत गोपाळकृष्ण गांधी यांच्या नावाची चर्चा होती, परंतु त्यांनीही नकार दिल्याने विरोधी पक्षांना नवा चेहरा शोधावा लागणार आहे. पवार यांनी मंगळवारी राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारावरून दिल्लीत विरोधी पक्षांची बैठक बोलाविली आहे.
विरोधी पक्षांची आज बैठक
पवारांकडून 21 जून रोजी बोलाविण्यात आलेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीत तृणमूल काँग्रेसचे महासचिव अभिषेक बॅनर्जी हे सहभागी होऊ शकतात. ममता बॅनर्जी यांच्या निश्चित कार्यक्रमांमुळे त्यांना बैठकीत भाग घेता येणार नसल्याचे समजते. विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ 24 जुलै रोजी समाप्त होणार आहे. तर राष्ट्रपतिपदाची निवडणूक 18 जुलै रोजी होईल.