स्थानिकांशी चर्चा करून तोडगा काढा
हिरेबागेवाडी-कोलारकोप्प शेतकऱ्यांना रस्ता सुरू करून देण्याची मागणी
बेळगाव : हिरेबागेवाडी व्याप्तीतील कोलारकोप्प रस्त्याशेजारी 20 वर्षांपासून शेतकऱ्यांना शेताकडे जाण्यासाठी रस्ता होता. मात्र आता 201 सर्व्हे क्रमांक असलेल्या शेतमालकांनी तक्रार करून जेसीबीच्या साहाय्याने रस्ता बंद केला आहे. यामुळे येथील शेतकऱ्यांना शेताकडे जाण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. यासाठी सदर ठिकाणी भेट देऊन स्थानिक चौकशीच्या आधारे समस्येचे निवारण करण्यात यावे. तसेच रस्ता पुन्हा सुरू करून शेतकऱ्यांना अनुकूल करून द्यावे, असे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमिनी याठिकाणी आहेत. गेल्या 20 वर्षांपासून शेताकडे जाण्यासाठी 201 सर्व्हे क्रमांकाच्या रस्त्यावरून शेतकरी ये-जा करत होते. अचानक सदर शेतमालकाकडून तक्रार करण्यात आली. तसेच जेसीबीच्या साहाय्याने रस्ता बंद करण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांना समस्या निर्माण झाली आहे. यासाठी सदर ठिकाणी अधिकाऱ्यांनी भेट देऊन स्थानिकांशी चर्चा करून तोडगा काढावा, असे आवाहन निवेदनातून करण्यात आले आहे.