For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नवउद्योजकांची आर्थिक पाठराखण

11:24 AM Jul 03, 2025 IST | Tarun Bharat Portal
नवउद्योजकांची आर्थिक पाठराखण
Advertisement

पीएमईजीपीद्वारे 50 लाखांपर्यंत कर्ज : मागीलवर्षी 7 कोटीहून अधिक निधी वाटप

Advertisement

बेळगाव : कोरोना महामारीवेळी अनेकांनी मोठ्या महानगरांमधील नोकऱ्या गमावल्या. यातील बऱ्याचशा युवकांनी गावी येऊन उद्योग-व्यवसाय सुरू केले. लहान उद्योगांना प्रोत्साहन देऊन नवउद्योजकांना आर्थिक स्थैर्य देण्यासाठी पीएमईजीपी ही योजना आखण्यात आली. बेळगाव जिल्ह्यामध्ये 2024-25 या आर्थिक वर्षात तब्बल 231 उद्योगांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. त्यामुळे चहाच्या स्टॉलपासून मोठे उद्योग उभे राहण्यासाठी युवकांना योजनेची मदत झाली आहे. केंद्र सरकारच्यावतीने व जिल्हा उद्योग केंद्र (डीआयसी) च्या सहकार्यातून प्रधानमंत्री एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्रॅम (पीएमईजीपी) योजना राबविण्यात येते. लघुउद्योगांना प्रोत्साहन मिळावे. तसेच रोजगार निर्मिती व्हावी, या उद्देशाने या योजनेतून 50 लाखांपर्यंचा कर्जपुरवठा उद्योगांना केला जातो.

जिल्ह्यातून अर्ज मागवून त्यांची छाननी केली जाते व त्यापैकी मोजक्याच उद्योगांना न्यूनतम व्याजाद्वारे आर्थिक साहाय्य दिले जाते. 2024-25 मध्ये बेळगाव जिल्ह्यातून योजनेसाठी हजारहून अधिक अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी 231 उद्योगांना कर्जपुरवठा करण्याचे निश्चित केले. बेळगाव जिल्ह्यातील उद्योगांना 7 कोटी 86 लाखांचे कर्जवाटप केल्याची माहिती जिल्हा उद्योग केंद्रातर्फे दिली आहे. खाद्यपदार्थ तयार करणे, शेतीवर अवलंबून उद्योग, दुग्धउत्पादने, कुक्कुटपालन व इतर व्यवसायांना कर्जपुरवठा करण्यात येतो. योजनेचा लाभ घेण्यासाठी खुल्या प्रवर्गातील व्यक्तीला एकूण कर्जापैकी 10 टक्के रक्कम स्वत: खर्च करावी लागते. उर्वरित 90 टक्के रक्कम कर्ज रूपाने दिली जाते. इतर प्रवर्गातील नागरिकांना 95 टक्के कर्ज देण्यात येते. ग्रामीण भागातील उद्योगांना 35 तर शहरी भागातील 25 टक्के अनुदान दिले जाते.

Advertisement

ऑनलाईन अर्ज दाखल करावा

पीएमईजीपी योजनेच्या माहितीसाठी उद्यमबाग येथील जिल्हा उद्योग केंद्राशी संपर्क साधला जाऊ शकतो. ज्या उद्योगाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी ऑनलाईन अर्ज दाखल करायचा आहे. पीएमईजीपी वेबसाईटवर 2025-26 या आर्थिक वर्षासाठी अर्ज स्वीकारले जात आहेत.

यावर्षी 231 उद्योगांना कर्जपुरवठा 

नवीन उद्योग उभे करण्यासाठी पीएमईजीपी योजना सर्वोत्तम ठरत आहे. या योजनेतून उद्योगांना कर्जपुरवठा करण्यासहअनुदान देखील दिले जाते. या योजनेमुळे बेळगाव जिल्ह्यातील अनेक उद्योग उत्तमरित्या कार्य करीत आहेत. यावर्षी 231 उद्योगांना कर्जपुरवठा करण्यात आला आहे.

-सत्यनारायण भट (जिल्हा उद्योग केंद्राचे सहसंचालक)

Advertisement
Tags :

.