महिलांना अर्थसहाय्य-सुरक्षा तर भूमिपुत्रांना प्राधान्य
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा वचननामा
मुंबई : मुलालाही मोफत शिक्षण, प्रत्येक जिल्ह्यात शिवाजी महाराजांचे मंदिर, भूमिपुत्र तसेच शेतकऱ्यांना प्राधान्य, महिलांना अर्थसहाय्य आणि सुरक्षेची हमी देण्यात आली आहे. यावेळी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ, वांद्र्यातील शासकीय वसाहतीतील लोकांना त्याच ठिकाणी घरे अशा अधिकच्या आश्वासनांचा वचननामा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाने प्रसिद्ध केला. बुधवारी मविआची पंचसूत्री जाहीर करण्यात आली असली तरी आघाडीतील प्रत्येक घटक पक्षाचा वेगळा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यापैकी गुऊवारी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर वचननामा प्रसिद्ध केला. यात मुलांना, भूमिपुत्रांना महिलांना अधिक प्राधान्य देण्यात आले आहे. यावेळी अनिल परब, सुभाष देसाई यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, आम्ही शिवसेनेचा ‘वचननामा‘ प्रकाशित केला असून यात राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर आम्ही काय करणार याची वचने देण्यात आली आहेत. यावर जनतेच्या सेवेत प्राधान्य दिले असल्याचे ठाकरे म्हणाले. तसेच आम्ही जे बोलतो तेच करतो. आम्ही अनेक आश्वासने पूर्ण केली आहेत आणि आजही जनतेचा आशीर्वाद मिळाल्यावर आम्ही दिलेली आश्वासने पूर्ण करणार असल्याचे ठाकरे म्हणाले.
ठाकरे पक्षाच्या वचननाम्यानुसार प्रत्येक जिह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मठ, देऊळ आणि प्रेरणादायी मंदिर उभारण्याम येणार आहे. शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येणार असून त्यांचे नुकसान होऊ देणार नाही. तसेच गहू, तांदूळ, डाळ, तेल आणि साखर या जीवनावश्यक वस्तूंचे भाव दोन वर्षे स्थिर ठेवण्यात येणार आहे. महिलांना मिळणारे सरकारी अर्थसहाय्य वाढविण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक पोलीस स्टेशन बाहेर स्वतंत्र 24 तास महिला पोलीस चौकीसाठी तरतूद, अंगणवाडी सेविका आणि आशा स्वयंसेविका यांच्या वेतनात वाढ करण्यात येणार. प्रत्येक कुटुंबाला 25 लाखांपर्यंतची कॅशलेस मेडिकल ट्रीटमेंट उपलब्ध करून देण्याचे वचन दिले आहे.