कोनवाळ गल्ली नाल्याची अखेर स्वच्छता
महापालिकेला उशिराने जाग : प्लास्टिक-थर्मोकोलचे प्रमाण अधिक
बेळगाव : कोनवाळ गल्ली परिसरातील नाल्यामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याचे वृत्त प्रसिद्ध होताच महापालिका प्रशासनाला जाग आली. बुधवारी सकाळपासून नाल्यातील कचरा काढण्याच्या कामाला सुरूवात करण्यात आली. जेसीबीच्या साहाय्याने नाल्यात साचलेले प्लास्टिक तसेच इतर कचरा काढून तो ट्रकमध्ये भरण्यात आला. नालेसफाई योग्यप्रकारे होत नसल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे. याचा परिणाम पावसाळ्यात पाणी ओव्हरफ्लो होऊन घरांमध्ये शिरत आहे. त्यामुळे नाल्याची सफाई योग्यरीतीने होणे गरजेचे आहे. कोनवाळ गल्ली येथील नाल्यात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक, थर्मोकोल यासह इतर कचरा साचल्याने नाल्यातील सांडपाणी थांबून आहे. यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली असून, आजूबाजूच्या व्यापारी तसेच हॉटेलना याच फटका बसत आहे.
तरुण भारत वृत्ताची दखल
तरुण भारतने काही दिवसांपूर्वीच नाल्याची स्वच्छता नसल्याचे वृत्त दिले होते. याची दखल घेत महापालिकेकडून बुधवारपासून नाल्याच्या स्वच्छतेचे काम सुरू करण्यात आले. जेसीबीच्या साहाय्याने नाल्यामध्ये अडकलेला कचरा व प्लास्टिक काढण्यात आले. कचरा मोठ्या प्रमाणात अडकल्याने दिवसभर नाला स्वच्छतेचे काम होते.
नाला स्वच्छतेची जबाबदारी नागरिकांचीही
नाल्याची स्वच्छता ठेवण्याची जबाबदारी केवळ महापालिकेची नसून ती नागरिकांचीही आहे. नागरिकच नाल्यामध्ये प्लास्टिक तसेच थर्मोकोल टाकत असल्याचे प्रकार अनेकवेळा उघडकीस आले आहेत. कोनवाळ गल्ली कॉर्नर येथे सीसी कॅमेराही बसविण्यात आला आहे. तरी देखील मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात असल्याने नागरिकांनीही आपली जबाबदारी ओळखून कचरा टाकणे थांबविणे गरजेचे आहे.