For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अखेर ओलमणी येथे टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू

12:02 PM Jun 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
अखेर ओलमणी येथे टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू
Advertisement

नागरिकांमधून समाधान : दोन महिन्यांपासून पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने उद्भवली होती पाणीटंचाई

Advertisement

वार्ताहर/जांबोटी

ओलमणी ता. खानापूर येथे उद्भवलेल्या तीव्र पाणीटंचाईची दखल घेऊन, जांबोटी ग्राम पंचायतने रविवारपासून गावात टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू केल्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. ओलमणी येथील सार्वजनिक नळपाणी पुरवठा गेल्या दोन महिन्याभरापासून विस्कळीत झाल्याने गावात तीव्र पाणीटंचाई उद्भवली होती. त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. पाण्याअभावी नागरिकांचे हाल होत होते. ओलमणी गावापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या मलप्रभा नदीतून जलवाहिन्याद्वारे पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.  नदीपात्रात मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. मात्र या परिसरात गेल्या महिन्याभरापासून होणारा अनियमित वीजपुरवठा तसेच या भागात झालेल्या मुसळधार वळीव पावसामुळे मलप्रभा नदीला पूर आल्याने नदीपात्रातील पाणी गढूळ झाले होते.

Advertisement

तसेच जलवाहिन्या फुटणे, विद्युत मोटारीत बिघाड, कमी दाबाचा वीजपुरवठा आदी तांत्रिक कारणांमुळे गावातील पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला आहे. परिणामी गावातील नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. गावात पाण्याची पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे नागरिकांचे पाण्यासाठी होणारे हाल दूर करण्यासाठी गावात टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा, अशी मागणी नागरिकांनी जांबोटी ग्राम पंचायतकडे केली होती. सदर मागणीची दखल घेऊन ग्राम पंचायतच्यावतीने अखेर रविवारपासून ओलमणी गावामध्ये दोन टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू करण्यात आल्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

‘तरुण भारत’च्या वृत्ताची दखल

ओलमणी गावात उद्भवलेल्या तीव्र पाणीटंचाई संदर्भात दै. ‘तरुण भारतच्या  अंकात वारंवार वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. गावाला टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासंदर्भात देखील सविस्तर वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. सदर वृत्ताची जांबोटी ग्राम पंचायतीने तातडीने दखल घेऊन गावाला टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केल्यामुळे ‘तरुण भारत’चे देखील नागरिकांमधून कौतुक होत आहे.

Advertisement
Tags :

.