देवेंद्र महतोकडून अखेर जलग्रहण
वांगचुक यांच्या आश्वासनानंतर घेतला निर्णय
वृत्तसंस्था,रांची
झारखंडच्या रांचीमध्ये जेपीएससी घोटाळ्यावरून विद्यार्थ्यांकडून करण्यात येणाऱ्या आंदोलनाला आता बळ मिळाले आहे. 4 दिवसांपासून उपोषण करणाऱ्या देवेंद्र महतो यांनी अखेर जलग्रहण केले आहे. जलग्रहण करण्यासाठी सोनम वांगचूक यांनी महतो यांची समजूत काढली. परंतु महतो यांनी उपोषण सुरू ठेवले असून अद्याप अन्नग्रहण केलेले नाही.
झारखंडमध्ये जेपीएससी परीक्षेतील गैरप्रकारांवरून विद्यार्थी आंदोलन करत आहेत. मुंडा स्टेडियममध्ये सुरू असलेल्या या आंदोलनात महतो यांनी मागील चार दिवसांपासून अन्न अन् जलग्रहण केले नव्हते. बुधवारी वांगचूक यांनी महतो यांच्याशी चर्चा करत त्यांना जल उपवास सोडण्यास तयार केले, यानंतर देवेंद्र महतोंनी लिंबू पाणी पित जलउपवास सोडला.
वांगचूक यांनी फोन करत महतो यांना आरोग्याची काळजी घेण्याची अन् पाण्यासोबत मध घेत राहण्याची सूचना केली. तुम्ही भेटायला तेव्हाच माझे उपोषण सोडेन. तुम्ही रांची येथील आंदोलनस्थळी यावे असे महतो यांनी वांगचूक यांना सांगितले. व्हिडिओ कॉल सुरू असताना वांगचूक यांच्या समोरच महतो यांनी स्वत:चा जल उपवास संपुष्टात आणला आहे.
महात्मा गांधींचे उदाहरण
महतो यांच्याशी बोलताना वांगचूक यांनी महात्मा गांधींचे उदाहरण दिले. उपोषणाचा अर्थ स्वत:ला नुकसान पोहोचविणे नाही. महात्मा गांधी जेव्हा उपोषण करायचे, तेव्हा लिंबूपाण्यासोबत मधही घेत होते. पाणी अन् लिंबासोबत मध घेतल्याने शरीरात ऊर्जा कायम राहते आणि शरीर अधिक दिवसांपर्यंत लढाई जारी ठेवण्यासाठी तयार राहते असे वांगचूक यांनी सांगितले. तसेच रांची येथे येत आंदोलनाला समर्थन देण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.