अखेर इन्सुली घाटातील ते काम ग्रामस्थांनी बंद पाडले
तरुण भारत मीडियाने आणली होती जाग
मयुर चराटकर
बांदा
राष्ट्रीय महामार्गावरील इन्सुली घाटात महामार्ग विभागाच्या डोळेझाकपणामुळे साईडपट्टी खोदून केबल टाकण्याचे काम सुरु आहे. विशेष म्हणजे हे केबल टाकण्याचे काम करत असताना '' सावधान रस्त्याचे काम सुरु आहे ''असा धुळफेक करणारा फलक संबंधितांकडून महामार्गाच्या नजिक लावण्यात आला आहे. असे वृत्त दैनिक तरुण भारतने सोशल मीडियावर प्रसारित करताच स्थानिक ग्रामस्थांनी सुरु असलेले काम बंद पाडले. यावेळी ज्या ठिकाणी साईडपट्टी खोदली त्याठिकाणी तात्काळ दगड टाकून साईडपट्टी होती तशी करा अशा सूचना दिल्या. आणि जर परत काम सुरु केल्यास आम्ही कायदा हातात घेऊ असा इशारा संबंधित ठेकेदाराला दिला. यावेळी महेंद्र सावंत, नितीन राऊळ, स्वामी नंदकिशोर पेडणेकर, आशिष राऊळ, विकास पेडणेकर आदी सह ग्रामस्थ उपस्थित होते. धोकादायक असणाऱ्या घाटात राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या नजरेआड काम सुरु असल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. तसेंच राष्ट्रीय महामार्ग विभागाला याबाबत जाब विचारणार असा इशारा उपस्थित ग्रामस्थांनी दिला. तसा ग्रामपंचायत मार्फत पत्रव्यवहार करणार असे सांगितले.