For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अखेर बेळगावचे उर्वरित भाविक सुखरूप दाखल

06:58 AM Feb 02, 2025 IST | Tarun Bharat Portal
अखेर बेळगावचे उर्वरित भाविक सुखरूप दाखल
Advertisement

प्रयागराजहून आगमन : सहकारी गमावल्याची बोलून दाखवली खंत : झालेल्या चेंगराचेंगरीची दिली माहिती 

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

महाकुंभ मेळ्यात पुण्यस्नानासाठी उत्तरप्रदेशमधील प्रयागराजला गेलेले बेळगाव येथील भाविक शनिवारी सायंकाळी दोन खासगी बसमधून सुखरूप परतले. एकूण 60 जणांपैकी चेंगराचेंगरीत चौघा जणांचा मृत्यू झाला आहे. बेळगावात दाखल झाल्यानंतर या भाविकांनी मौनी अमावस्येदिवशी झालेली चेंगराचेंगरी व चार भाविकांच्या मृत्यू याविषयी माहिती दिली. सावगाव येथील साईरथ ट्रॅव्हल्सच्या दोन बसमधून 26 जानेवारी रोजी बेळगाव येथील 60 भाविक प्रयागराजला गेले होते. 29 जानेवारी रोजी पुण्यस्नानावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत अरुण कोपर्डे, महादेवी बावनूर, ज्योती हत्तरवाट व मेघा हत्तरवाट या चौघा जणांचा मृत्यू झाला होता. विमानाने दोघांचे मृतदेह थेट बेळगावला तर आणखी दोघांचे मृतदेह गोव्याला आणून तेथून बेळगावला आणण्यात आले होते.

Advertisement

खासगी बसमधून गेलेले उर्वरित भाविक शनिवारी सायंकाळी सुखरूपपणे परतले. आपल्यासोबत प्रयागराजला आलेल्या चौघा जणांचा मृत्यू झाला. ते आपल्यासोबत येऊ शकले नाहीत, याची खंत या भाविकांच्या मनात आहे. यापैकी काही जणांनी प्रयागराजमधील गर्दी, शासकीय व्यवस्था, पुण्यस्नानावेळी झालेली चेंगराचेंगरी आदींविषयी माहिती दिली. 29 जानेवारी रोजी झालेल्या चेंगराचेंगरीवेळी गर्दीमुळे प्रचंड त्रास झाला. जखमींना वेळेत इस्पितळात पोहोचवता आले नाही. आपल्याजवळील मोबाईल,

बॅग हरवल्यामुळे सहकाऱ्यांशी किंवा कुटुंबीयांशी वेळेत संपर्क साधता आला नाही. दुपारी 3 पर्यंत चार जण जखमी आहेत, इतकीच आम्हाला माहिती होती. उत्तरप्रदेशमधील प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत आम्ही वेगवेगळ्या इस्पितळांना भेटी देऊन आमच्या सहकाऱ्यांसाठी शोध घेत होतो. दुपारी 3 नंतर चौघेजण दगावल्याचे आम्हाला समजले. त्यानंतर कसेबसे बेळगाव येथील कुटुंबीयांना यासंबंधी माहिती दिल्याचे चिदंबर पाटील या भाविकाने सांगितले. विशेष जिल्हाधिकारी हर्षा शेट्टी, अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख हरिराम शंकर आदींची मदत लाभली. रुग्णवाहिकेतून मृतदेह प्रयागराजमधून बाहेर काढणेही कठीण होते. कसेबसे दिल्लीपर्यंत येऊन तेथून विमानाने ते बेळगाव व गोव्याला पाठविण्यात आले. मृतदेहांसमवेत चौघा जणांना बेळगावला पाठविण्यात आले होते. राज्य सरकारची यासाठी मदत मिळाली. खासदार जगदीश शेट्टर यांनीही दूरध्वनीवरून संपर्क साधला, असेही चिदंबर यांनी सांगितले. 60 पैकी चौघा जणांचा मृत्यू झाला आहे. मृतदेहांसमवेत विमानाने चौघे जण बेळगावला आले होते. उर्वरित 52 जण शनिवारी सायंकाळी खासगी बसने परतले. महाकुंभ मेळ्यात सहभागी झाल्याचा आनंद या चौघा जणांच्या मृत्यूमुळे उर्वरित भाविकांच्या मनात नव्हता. आपल्यासोबत आलेले चार भाविक दगावले, याची सल प्रत्येकाला होती.

Advertisement
Tags :

.