..अखेर सेन्सेक्सच्या विक्रमी प्रवासाला विराम!
एचडीएफसी बँक, टायटन, टाटा स्टील यांच्या समभागातील विक्रीचा परिणाम
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय भांडवली बाजारात मागील दोन सत्रांमध्ये प्राप्त केलेली विक्रमी उंची चालू आठवड्यातील अंतिम सत्रात शुक्रवारी मात्र थांबली आहे. यात एचडीएफसी बँक, टायटन, टाटा स्टील आणि महिंद्रा अॅण्ड महिंद्रा यांच्या समभागांमधील विक्रीमुळे हा परिणाम झाला असल्याचे पहावयास मिळाले आहे.
मुख्य कंपन्यांच्या कामगिरीसोबत दिवसअखेर बीएसई सेन्सेक्स 53.07 टक्क्यांनी घसरुन निर्देशांक 79,996.60 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी दिवसअखेर 21.70 अंकांची =तेजीची झुळूक प्राप्त करत निर्देशांक 24,323.85 वर बंद झाला आहे.
शुक्रवारच्या सत्रात 30 समभागांमधील 17 समभाग हे वधारले आहेत. यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज, स्टेट बँक, एनटीपीसी, हिंदुस्थान युनिलिव्हर आणि लार्सन अॅण्ड टुब्रो यांचे समभाग हे तेजीमध्ये पहिल्या पाचमध्ये राहिले आहेत. यासह नेस्ले इंडिया, पॉवरग्रिड कॉर्प, आयटीसी, जेएसडब्ल्यू स्टील, सनफार्मा, कोटक बँक, बजाज फायनान्स, भारती एअरटेल, अॅक्सिस बँक, मारुती सुझुकी, टेक महिंद्रा आणि आयसीआयसीआय बँक यांचे समभाग नफा कमाईत राहिले आहेत.
अन्य कंपन्यांमध्ये सेन्सेक्समधील 30 मधील 13 समभाग हे नुकसानीत राहिले आहेत. यामध्ये एचडीएफसी बँक, टायटन, टाटा स्टील, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा आणि इंडसइंड बँक यांचे समभाग हे सर्वाधिक घसरणीत राहिले. यासह अल्ट्राटेक सिमेंट, टाटा मोर्ट्स, एचसीएल टेक, एशियन पेन्ट्स, बजाज फिनसर्व्ह, टीसीएस, अदानी पोर्ट्स आणि इन्फोसिस यांचे समभाग नुकसानीत राहिले आहेत.
शेअर बाजारातील उपलब्ध आकडेवारीनुसार विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी गुरुवारी निव्वळ 25.67 अब्ज डॉलरच्या समभागांची खरेदी केली आहे. तर देशातील संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 23.75 अब्ज डॉलरच्या समभागांची विक्री केली असल्याची माहिती आहे. आगामी आठवड्यात बाजारातील नव्या विक्रमांचे सत्र सुरु राहणार का? की सेन्सेक्स व निफ्टीमधील प्रवास संथपणे सुरु राहणार हे पहावे लागणार असल्याचे शेअर बाजार अभ्यासकांनी म्हटले आहे.