For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अखेर आर्द्रा नक्षत्राच्या पावसाने बळीराजाला तारले

12:05 PM Jun 24, 2026 IST | Tarun Bharat Portal
अखेर आर्द्रा नक्षत्राच्या पावसाने बळीराजाला तारले
Advertisement

मृग नक्षत्र पूर्णपणे कोरडे गेले : पावसाला सुरुवात झाल्याने शेतकरी वर्ग सुखावला

Advertisement

वार्ताहर/किणये

पाऊस कधी येणार, याकडे बळीराजासह साऱ्यांच्याच नजरा लागून राहिल्या होत्या. मृग नक्षत्र पूर्णपणे कोरडे गेले होते. यामुळे शेतकऱ्यांची आशा आर्द्रा नक्षत्रावर अवलंबून होती. अखेर मंगळवारी दुपारनंतर आर्द्रा नक्षत्राच्या पावसाने तालुक्यात हजेरी लावली आहे. यामुळे बळीराजा सुखावला आहे. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर झालेल्या या पावसाने बळीराजाला तारले आहे.त्यामुळे खरीप हंगामातील पिके घ्यायची कशी याची चिंता शेतकऱ्यांना लागून राहिली होती. भात पेरणी केलेल्या पिकाला शेतकरी टँकरचे पाणी विकत घेऊन पाणी देत होते.

Advertisement

पावसाअभावी बहुतांशी शिवारातील भातपिके पूर्णपणे सुकून गेली आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दि. 22 रोजीपासून आर्द्रा नक्षत्राला प्रारंभ झाला. या नक्षत्राचा पहिल्या दिवशी हवामानात बदल घडून आला सोमवारी सायंकाळी ढगाळ वातावरणही निर्माण झाले. मंगळवारी सकाळपासूनच वातावरणात बदल दिसून आला काही ठिकाणी सकाळी पावसाची रिमझिम सुरू झाली. दुपारनंतर तालुक्याच्या सर्रास भागात पावसाने हजेरी लावल्यामुळे तालुक्यातील शेतकरी वर्ग सुखावला असून शेतीकामांना जोर येणार आहे.

उचगाव परिसरातील सुकणाऱ्या पिकांना पावसामुळे जीवदान

उचगाव परिसरात मंगळवारी सायंकाळी संततधार पावसाला प्रारंभ झाल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील सुकून, करपून जाणाऱ्या पिकांना आता थोडे जीवदान मिळाल्याचे चित्र सध्यातरी पहावयास मिळत आहे.यामुळे सध्या सुरू झालेल्या या पावसामुळे शेतकरी वर्गात आनंद पसरला आहे.  पुन्हा एकदा आता शेतकरी वर्ग आळस झटकून नव्या उमेदीने कामाला शेतवडीत गुंतेल असे चित्र आता सर्वत्र स्पष्ट दिसू लागले आहे. चालूवर्षीच्या हंगामात मान्सूनने जवळपास 23 दिवस दडी मारल्याने सर्वच पिके, बी बियाण्यांची पेरणी तसेच रताळ्याची लागवड, भात पेरणी ही कामे खोळंबून राहिली होती. म्हणावा तसा वळीवही या परिसरात यावर्षी न झाल्याने आणि शेतवडीत ओल नसल्याने सर्व बी बियाणे पेरणी शेतकरी वर्गाने तहकूब ठेवली होती. रोज उठल्यानंतर पावसाची प्रतीक्षा शेतकऱ्यांकडून होत असतानाच मंगळवारी सायंकाळी संततधार पावसाला प्रारंभ झाल्याने आता शेतकरी शेतीकामात मग्न असल्याचे चित्र दिसून येणार आहे.

कंग्राळी, अलतगा, गौंडवाड परिसरात पावसाची दमदार सुरुवात

कंग्राळी बुद्रुक, कंग्राळी खुर्द, अलतगा, गौंडवाड परिसरामध्ये मंगळवारी सायंकाळी मान्सून पावसाची दमदार सुरुवात झाल्यामुळे परिसरातील शेतकरी वर्गातून समाधानाचे वातावरण दिसून येत आहे. परिणामी भातरोप लागवडीसाठी टाकलेल्या व भात पेरणी केलेल्या तरुला सदर पावसाने जीवदान मिळाल्याचेही चित्र दिसून येत आहे. यावर्षी रोहीणी नक्षत्र, मृग नक्षत्र या पावसानी हुलकावणी दिल्यामुळे त्यातच गेला महिना कडक उन्ह पडत असल्यामुळे शेतकरी वर्गाला कपाळाला हात लावून बसण्याची वेळ आली होती. कंग्राळी बुद्रुक, कंग्राळी खुर्द, अलतगा, गौंडवाड परिसरामध्ये जवळजवळ 40 टक्केहून अधित भातरोप लागवड करण्यात येते.

यामुळे सदर परिसरामध्ये पावसाची नितांत गरज होती. भातरोप लागवडीसाठी भातरोप टाकलेल्या ज्यांनी विद्युत पंपसेटची सोय असलेल्या शेतकरी वर्गाने पंपसेटद्वारे भातरोप तरुला पाणी सोडले. परंतु विहिरीची सोय नसलेल्या शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरच्या सहाय्याने टँकरने तर कुणी सायकलीवरून, दुचाकीवरून तर कोणी डोक्यावरून हंड्याने पाणी ओतून भातरोप तर जगविण्याचे प्रयत्न केल्याचे चित्र दिसून आहे. हवामान अंदाजानुसार पावसाचे कोणतेच चित्र दिसत नसल्यामुळे यावर्षी भात सुगीचे काय होणार, अशी भीती भेडसावत असतानाच मंगळवारी वातावरणात थोडा बदल झाला आणि सायंकाळी थोड्या दमदार पावसाने सुरुवात केल्यामुळे शेतकरी वर्गाचा जीव भांड्यात पडल्याचे चित्र दिसून येत आहे.

ऊस पीक भरघोस

सध्या साखर कारखान्यांकडून ऊस पिकाला टनाला 3400 ते 3500 रुपये दर मिळत असल्यामुळे परिणामी कंग्राळी किर्यात भागात पुन्हा ऊस उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ऊस लागवड केली आहे.

Advertisement
Tags :

.