For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अखेर पर्जन्यराजाचे दिमाखदार आगमन

02:50 PM Jun 23, 2026 IST | Tarun Bharat Portal
अखेर पर्जन्यराजाचे दिमाखदार आगमन
Advertisement

जोर नसल्याने साशंकता : पुढील चार दिवस मुसळधार शक्य

Advertisement

पणजी : सोमवारी राज्यात सर्वत्र जोरदार पावसाची नोंद झाली. सर्व ठिकाणी पाऊस आक्रमक झाला, मात्र दुपारच्या दरम्यान चक्क ऊन पडले. त्यामुळे सर्वांना पाऊस पुन्हा गायब झाला की काय, असे वाटले. मात्र सायंकाळी पुन्हा एकदा पावसाचे आगमन झाले. पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. सध्या पडणारा पाऊस हा काही दिवस जोर धरणार आहे. दरवर्षी एव्हाना 25 इंच पावसाची वार्षिक नोंद होत होती. यंदा मात्र ती केवळ सात पूर्णांक पाच इंच एवढीच झालेली आहे. राज्यात रविवारी रात्री अनेक भागात जोरदार पाऊस पडला. सोमवारी पहाटे पुन्हा एकदा पावसाने जोर धरला. त्यानंतर दिवसभर ढगाळ वातावरण राहिले. अधूनमधून पावसाच्या सरी पडून गेल्या. भर दुपारी सर्वत्र लखलखीत ऊन पडले. सायंकाळी पुन्हा एकदा पावसाच्या सरी पडून गेल्या.

पावसाला अपेक्षित जोर नाही

Advertisement

पावसाला अजून जोर आलेला नाही. पावसासाठी पूरक असे वातावरण निर्माण होते आणि अचानक पाऊस गायब होतो, अशी विचित्र अवस्था दिसून आली. चार दिवस मुसळधार पाऊस पडल्याशिवाय राज्यातील विविध धरणांमध्ये पाण्याची आवक सुरू होणार नाही. सध्या कुठेही पाण्याची आवक झालेली नाही. मात्र सकाळपासून नद्यांचे प्रवाह पुन्हा सुरू झाले.

अद्याप 70 टक्के पाऊस कमी

सध्याची परिस्थिती पाहता, सध्या पडणाऱ्या पावसाला जोर नसल्याने तो आपले इप्सित साध्या करील काय, तसेच वार्षिक सरासरीपर्यंत तो पोहोचेल काय, याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. एक जूनपासून आतापर्यंत केवळ साडेसात इंच एवढा पाऊस झालेला आहे. याच कालावधीमध्ये दरवर्षी 25 इंच एवढा पाऊस पडत असतो. म्हणजे सद्यस्थितीमध्ये अद्याप 70 टक्के पाऊस कमी आहे.

पुढील चार दिवस मुसळधार?

हवामान खात्याने पुढील चार दिवस मुसळधार पाऊस पडेल तसेच मेघगर्जनेसह वाऱ्यासह तो पडणार असा इशारा देऊन येलो अलर्ट जारी केले आहे. मात्र पावसाला जोर नसल्यामुळे पुढील चार दिवसात तो सर्वत्र मुसळधार पडेल की काय याची शाश्वती देता येत नाही. ही परिस्थिती राहिली तर गोव्यात पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवणार. एवढ्यात धरणामध्ये पाण्याची आवक सुरू होणे आवश्यक असते.

काणकोणात सर्वाधिक सव्वादोन इंच पाऊस

हवामान खात्याने वाळपई सोडून इतर सर्व केंद्रामध्ये पडलेल्या पावसाची नोंद जाहीर केली आहे. गेल्या 24 तासांमध्ये सर्वाधिक सव्वा दोन इंच पाऊस काणकोण येथे पडला. मडगाव दोन इंच, साखळी, फोंडा, दाबोळी येथे प्रत्येकी एक इंच, म्हापसा व केपे येथे प्रत्येकी पाऊण इंच, जुने गोवे, पणजी, धारबंदोडा येथे प्रत्येकी अर्धा इंच पावसाची नोंद झाली. त्या तुलनेत सांगे, पेडणे, मुरगाव येथे अर्धा इंचापेक्षा कमी पाऊस पडला.

Advertisement
Tags :

.