For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अखेर भू-भाड्याचा ठेका जाधवना मंजूर

11:14 AM Sep 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
अखेर भू भाड्याचा ठेका जाधवना मंजूर
Advertisement

2 कोटी 8 हजारची बोली : मागील वर्षापेक्षा तिपटीने झाला लिलाव : वाढत्या स्पर्धेमुळे मनपालाच फायदा 

Advertisement

बेळगाव : शहरातील भू-भाडे वसुलीचा ठेका ई लिलावद्वारे काढण्यात आला होता. त्यामध्ये सुरुवातीला 9 जणांनी तर त्यानंतर 5 जणांनी शेवटपर्यंत बोली लावली. भिमू जाधव कंग्राळी खुर्द यांनी सर्वात जास्त बोली लावली असल्यामुळे अखेर त्यांना भू-भाड्याचा ठेका देण्यात येणार आहे. अद्याप संपूर्ण प्रक्रिया होणे बाकी असून, त्यानंतर त्यांच्याकडे भू-भाडे वसुलीची सूत्रे दिली जाणार असल्याची माहिती महानगरपालिकेतील महसूल विभागातून देण्यात आली आहे. संपूर्ण शहरातील भू-भाडे वर्षभराच्या वसुलीसाठी 2 कोटी 8 हजार रुपये बोली लागली आहे. जाधव यांनी संपूर्ण नियमानुसार ई लिलावद्वारे सर्व कागदपत्रे दाखल केली होती. त्यानंतर आता सर्वात जास्त बोली त्यांनीच लावली आहे. 2 कोटी 8 हजार त्याला जीएसटीही लागू होणार आहे. त्यामुळे महानगरपालिकेला यावर्षी भू-भाडे लिलाव प्रक्रियेतून मोठी रक्कम मिळाली आहे. वास्तविक महानगरपालिकेने 1 कोटी 23 लाख इतकीच बोली निश्चित केली होती. मात्र वाढलेल्या स्पर्धेमुळे ही रक्कम अधिक झाली आहे. महानगरपालिकेला याचा फायदा झाला आहे.

बोलीची रक्कम वेळेत वसूल करणे गरजेचे

Advertisement

गेल्या वर्षभरापासून भू-भाडे लिलाव प्रक्रिया राबविताना अडचणी निर्माण झाल्या. पूर्वीच्या भू-भाडेधारकांनी महानगरपालिकेविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने संबंधित कंत्राटदाराला रक्कम भरण्यासाठी मुदत दिली होती. त्यानुसार ती रक्कम वसूल करण्यात आली. यावर्षी 2 कोटीच्यावर बोली लागली आहे. मात्र ती रक्कम वेळेत वसूल करणे गरजेचे आहे. मागील काही आलेल्या अनुभवानुसार ई लिलाव प्रक्रियेमध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत. त्या नियमानुसार ही रक्कम भरून घेतली जाणार असल्याचे महसूल विभागाने सांगितले आहे.

कंत्राटदाराने नियमांचे पालन करण्याची आवश्यकता

भू-भाडे वसूल करण्यासाठी महानगरपालिकेने दिलेल्या नियमांचे पालन कंत्राटदाराने केले पाहिजे. जमिनीवर बसून व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांकडून 10 रुपये, हातगाडीवर व्यवसाय करणाऱ्यांकडून 20 रु., नारळ-पाणी तसेच इतर व्यवसाय करणाऱ्यांकडून 50 रुपये वसूल करण्याची मर्यादा देण्यात आली आहे. संपूर्ण शहरामधील ठेका भिमू जाधव यांना दिला असून लवकरच संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती महसूल विभागाने दिली आहे.

Advertisement
Tags :

.