अखेर महायुतीचे ठरले
भाजप 140 तर शिवसेना 87 जागांचा फॉर्म्युला : मुंबईमधील प्रमुख जागांवर चर्चा
मुंबई, नागपूर :
आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि शिवसेनेत (शिंदेगट) यांच्या जागावाटपासाठी चर्चेच्या फ्रेया सुरु आहेत. या चर्चेअंती आता भाजप आणि शिंदे सेनेच्या मुंबईतील जागावाटपाचा नवा फॉर्म्युला समोर आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मुंबई महापालिकासाठी महायुतीचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला आहे. त्यानुसार मुंबई महापालिकेच्या 227 जागांपैकी भाजप 140 आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना 87 जागा लढवणार असल्याची माहिती मिळत आहे. या महापालिकेमध्ये महायुतीतील अजित पवारांची राष्ट्रवादी स्वतंत्र लढणार आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेना मिळून 227 जागा लढवणार आहेत. याबाबतची अधिकृत घोषणा आता कधी होणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. 
यापूर्वी जागावाटपाच्या पहिल्या बैठकीत भाजपने मुंबईत शिंदे गटासाठी फक्त 52 जागा सोडण्याची तयारी दाखवली होती. मात्र, ठाकरे बंधूंच्या युतीनंतर भाजपने आता शिवसेनेला जास्त जागा देऊ केल्या होत्या. परंतु, जागावाटपच्या या सूत्रावर अधिकृतरित्या शिक्कामोर्तब कधी होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
नवी मुंबईतील महायुतीचा निर्णय लवकरच : माजी महापौर सागर नाईक
नामनिर्देशन अर्ज भरण्याचा कालावधी मोजून चार दिवसावर ठेपला आहे. तरीसुद्धा नवी मुंबई स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी संदर्भात महायुतीची घोषणा अजून झाली नाही.यावर पत्रकारांनी माजी महापौर तथा भाजपचे ऐरोली विधानसभा क्षेत्राचे संपर्कप्रमुख सागर नाईक यांना युती बाबत विचारले असता आज किंवा उद्या युतीचा निर्णय होईल अशी माहिती दिली.
नागपूरमध्ये शिंदेसेना आणि भाजप एकत्र
नागपुरात विदर्भातील युती संदर्भात एक महत्वपूर्ण बैठक पार पडली आहे. यात अखेर विदर्भात महायुतीचे आकार निश्चित झाल्याची माहिती आहे. विदर्भातील नागपूर, अमरावती, चंद्रपूर आणि अकोला या चारही शहरात भाजप आणि शिवसेना महायुती करत निवडणूक लढवणार आहे. तर चंद्रपूर आणि अकोल्यामध्ये महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसचा ही समावेश राहणार आहे. मात्र नागपूर आणि अमरावतीत राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीच्या बाहेर राहून स्वतंत्र निवडणूक लढवेल, अशी सूत्रांची माहिती आहे.
विदर्भातील चारही मनपात युती
भाजपच्या विदर्भ कार्यालयात दुपारपासूनच भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेत अकोला, अमरावती आणि चंद्रपूरमधील भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. दुसऱ्या बाजूला उदय सामंत आणि संजय राठोड यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या नागपूर, अमरावती, अकोला आणि चंद्रपूर शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक हॉटेल सेंटर पॉईंटमध्ये पार पडली. त्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांनी भाजप कार्यालयात येऊन भाजप नेत्यांची भेट घेतली आणि त्यामध्येच दोन्ही पक्ष चारही शहरात महायुती करून निवडणूक लढवतील, असे ठरले आहे.