महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अखेर काँग्रेसचा निर्णय

06:30 AM Jan 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अयोध्येत रामजन्मभूमीच्या स्थानी निर्माण होत असलेल्या भव्य राममंदिरात भगवान रामलल्ला यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा 22 जानेवारीला करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी राजकीय नेत्यांसह समाजातील सर्व स्तरांमधील मान्यवरांना निमंत्रण पाठविण्यात आले आहे. निमंत्रितांमध्ये काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि विद्यमान पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचाही समावेश होता. दोन्ही नेत्यांना गेल्या महिन्यातच निमंत्रण पाठविण्यात आले होते. तथापि, त्यांनी हे निमंत्रण स्वीकारायचे की नाकारायचे, हा निर्णय जवळपास तीन आठवडे घेतलाच नव्हता. मधल्या काळात मार्क्सवादी नेते सीताराम येच्युरी यांनी मात्र, निमंत्रणाचा स्वीकार न करण्याचा निर्णय स्पष्ट केला होता. धर्म ही व्यक्तीगत बाब असल्याने आम्ही हे निमंत्रण स्वीकारु शकत नाही, असे प्रतिपादन त्यांनी केले होते. काँग्रेसमध्ये मात्र, कोणता निर्णय घ्यावा, यासंबंधी बराच गोंधळ होता, असे दिसून येत होते. त्यामुळे हे दोन ज्येष्ठ नेते काय करणार याची उत्सुकता होती. अखेर तीन दिवसांपूर्वी त्यांनी निमंत्रण नाकारण्याचा निर्णय घोषित केला. ‘राममंदिरात प्राणप्रतिष्ठा हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्ष यांचा कार्यक्रम आहे. त्यात राजकारण अंतर्भूत आहे. अशा कार्यक्रमाला आम्ही जाणार नाही. आम्ही सन्मानपूर्वक निमंत्रण नाकारत आहोत,’ असे वक्तव्यही या नेत्यांनी दिले आहे. त्यामुळे आता या मुद्द्यावर पडदा पडेल असे वाटत होते. तथापि, या निर्णयावर बऱ्याच उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. हा निर्णय घेऊन काँग्रेसने मोठा धोका पत्करला आहे, असे मानले जात आहे. गुजरातमधील काँग्रेस पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष अर्जुन मोडवाडिया यांनी यासाठी स्वपक्षावरच टीका केली आहे. आणखीही चार काँग्रेस नेत्यांनी हा निर्णय चुकीचा असल्याचे मत व्यक्त केले. इतर बऱ्याच महत्वपूर्ण काँग्रेस नेत्यांनी सूचक मौन पाळले आहे. त्यामुळे या मुद्द्यावर पडदा न पडता गोंधळ अधिकच वाढला आहे. इतकेच नव्हे, तर कर्नाटकातील आणि तेलंगणातील काँग्रेस सरकारांनी 22 जानेवारीला राज्यांमधील मंदिरांमध्ये विशेष पूजा आयोजित केली जाईल, असे स्पष्ट केले आहे. एकीकडे याच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी अध्यक्षा यांनी प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाला जाण्यास नकार दिला आहे, तर दुसरीकडे याच पक्षाची काही राज्यसरकारे याच्या विपरीत कृती करताना दिसून येत आहेत. याचाच अर्थ असा की प्रत्यक्ष काँग्रेसमध्येच यासंबंधात एकवाक्यता नाही, हे स्पष्ट दिसत आहे. सोनिया गांधी आणि खर्गे यांनी असा निर्णय का घेतला, याची कारणे सविस्तरपणे स्पष्ट केलेली नाहीत. पण, जाण्याचा निर्णय घेतल्यास मुस्लीम मतदार नाराज होतील, अशी चिंता काँग्रेसला वाटत होती, असा या निर्णयाचा अर्थ काहीजणांनी लावला आहे. काँग्रेसला हिंदू मते गमवावी लागतील याची चिंता वाटत नाही, पण मुस्लीम मतांसंबंधी तो पक्ष संवेदनशील आहे, अशीही चर्चा सोशल मीडियावर होत आहे. तसेच हा निर्णय घेऊन काँग्रेसने लोकसभा निवडणूक जवळ येत असताना भारतीय जनता पक्षाच्या हातात आयतेच कोलीत दिले आहे, असेही बोलले जात आहे. काही जणांच्या मते काँग्रेसला या लोकसभा निवडणुकीतही उत्तर भारतात, फारशी संधी नाही. अशा वेळी दक्षिण भारतातील आपली लोकप्रियता तरी अबाधित राखावी, या हेतूने हा निर्णय घेण्यात आला. अन्य काही जाणकारांच्या मते आपल्या दक्षिण भारतातील मित्रपक्षांना समाधानी ठेवण्यासाठी काँग्रेसने हा निर्णय घेतला आहे. तथापि, भगवान रामचंद्रांची जेवढी लोकप्रियता उत्तरेत आहे, तेव्हढीच दक्षिणेतही आहे. तामिळनाडूसह दक्षिण भारतात रामन, रामचंद्रन, राघवन, रामय्या, सीतारामन इत्यादी नावे अतिशय प्रचलित आहेत. या भागातील कित्येक राजकारण्यांची नावेही रामावरुन आहेत. दक्षिण भारतात राम ही आदरणीय देवता नसती, तर रामासंबंधीची नावे इतक्या प्रमाणात, पूर्वीपासून आतापर्यंत प्रचलित असती काय?दक्षिण भारतात भगवान रामचंद्रांची मंदिरेही अनेक आहेत. प्राचीन मंदिरेही आहेत. तेव्हा भगवान रामचंद्रांच्या नावे, भारताची उत्तर-दक्षिण अशी विभागणी करणे, हे राजकीयदृष्ट्याही लाभदायक ठरेल असे वाटत नाही. उलट, प्रभू रामचंद्र हे उत्तर भारत आणि दक्षिण भारत यांना सांस्कृतिकदृष्ट्या आणि धार्मिकदृष्ट्या जोडणारा एक महत्त्वाचा सेतू आहेत. प्रभू रामचंद्रांचा जन्म उत्तरेत असला तरी वनवासाच्या 14 वर्षांमधील मोठा कालखंड त्यांनी आपले बंधू आणि पत्नी यांच्यासह दक्षिण भारतातच व्यतीत केला आहे. त्यामुळे उत्तर भारत विरुद्ध दक्षिण भारत या कारणास्तव काँग्रेसने हा निर्णय घेतला असेल तर तो तार्किकदृष्ट्या योग्य वाटत नाही. कदाचित, काँग्रेस नेते अद्यापही, अयोध्येतील राममंदिराचा हा विषय लोकसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीने कितपत प्रभावी ठरेल, याची चाचपणी करत असावेत. त्यामुळे ज्येष्ठ नेत्यांनी निमंत्रण नाकारणे, पण त्याचवेळी काँग्रेसच्या राज्यसरकारांनी मात्र, प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमांशी वेगळ्या प्रकारे स्वत:ला जोडून घेणे, अशी परस्परविरोधी भूमिका हा पक्ष घेत असावा. या भूमिकेचा नेमका परिणाम काय होणार आहे, यासंबंधी निश्चित भविष्यवाणी करणे सध्यातरी कोणाला शक्य नाही. प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमासंबंधात आणि त्याचा परिणाम म्हणून भविष्यात वातावरणनिर्मिती कशी होते, या विषयाचा प्रभाव कसा आणि किती असेल, यावर सर्वकाही अवलंबून राहणार आहे. त्यासाठी आणखी दोन महिन्यांचा कालावधी जावा लागणार आहे. राममंदिराच्या प्रश्नावर देशाच्या राजकारणाने एक निर्णायक वळण घेतले आणि त्याचे परिणाम आजही स्पष्टपणे दिसून येतात हे निश्चित आहे. तेव्हा काँग्रेसचा हा निर्णय राजकीयदृष्ट्या आणि लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीकोनातून त्या पक्षासाठी धोक्याचा ठरेल की ठरणार नाही, हे पाहणे मोठे औत्सुक्याचे ठरणार आहे. येत्या काही कालावधीत या प्रश्नाचे उत्तर मिळेलच. सध्या देशातील वातावरण मात्र राममय झाले आहे हे निश्चित. अशा स्थितीत काँग्रेसने घेतलेला हा निर्णय त्या पक्षाला नेमका कोठे घेऊन जातो, हे काही कालावधीनंतर स्पष्ट होईलच. राममंदिर निर्मिती न्यासाने काँग्रेस किंवा इतर धर्मनिरपेक्ष म्हणवून घेणाऱ्या पक्षांना नेत्यांना प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे निमंत्रण देऊन त्यांची कळत नकळत राजकीय कोंडी करुन ठेवली एवढे मात्र स्पष्ट म्हणता येते.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article