For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

अखेर सुमलता यांचा युतीला पाठिंबा

06:41 AM Apr 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
अखेर सुमलता यांचा युतीला पाठिंबा

मंड्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा : भाजपात करणार प्रवेश

Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

मंड्या लोकसभा मतदारसंघाच्या विद्यमान खासदार सुमलता अंबरिश यांनी यावेळची लोकसभा निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला आहे. 6 एप्रिल रोजी भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याची घोषणा त्यांनी केली असून मंड्या मतदारसंघातील भाजप-निजद युतीचे उमेदवार माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

Advertisement

निजदशी युती केल्यामुळे मंड्या मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीचे तिकीट देणार नसल्याचे भाजपने स्पष्ट केले होते. त्यामुळे द्विधा मन:स्थितीत असलेल्या अपक्ष खासदार सुमलता यांनी आपल्या समर्थक आणि चाहत्यांशी चर्चा करून लवकरच भूमिका स्पष्ट करणार असल्याचे सांगितले होते. सुमलता यांच्यामुळे मंड्या मतदारसंघाविषयी राज्यभरात कुतूहल निर्माण झाले होते. अखेर त्यांनी भाजपात प्रवेश करण्याबरोबरच निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला आहे.

Advertisement

2019 च्या लोकसभा निवडणुकीवेळी सुमलता यांनी काँग्रेसकडे तिकिटाची मागणी केली होती. परंतु, त्यावेळी काँग्रेस-निजदमध्ये युती झाली होती. त्या अनुषंगाने मंड्या लोकसभा मतदारसंघ निजदला देण्यात आला होता. त्यामुळे सुमलता यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत बाजी मारली होती. निवडणुकीनंतर त्यांनी भाजपला पाठिंबा दिला. परंतु, यावेळी भाजपकडून तिकिटाची मागणी करणाऱ्या सुमलता यांच्या वाट्याला पुन्हा निराशा आली. त्यामुळे त्या पुन्हा अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवतील, अशी भीती असल्याने भाजपश्रेष्ठींनी त्यांना मागील आठवड्यात दिल्लीला बोलावून घेत समजूत काढली होती. अखेर भाजपश्रेष्ठींच्या प्रयत्नांना यश आले आहे.

मंड्या येथे बुधवारी समर्थकांची जाहीर सभा घेतल्यानंतर सुमलता यांनी आपला निर्णय जाहीर केला. लोकसभेची निवडणूक मी मंड्या मतदारसंघातून लढविणार नाही. भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. निवडणूक लढविणार नाही, याचा अर्थ मंड्या सोडून जाईन, अशी समजूत करून घेऊ नका. मी मंड्या येथूनच राजकारण करेन. या लोकसभा निवडणुकीत भाजप-निजद युतीचे उमेदवार कुमारस्वामी यांना पाठिंबा देणार आहे, अशी घोषणा त्यांनी केली. दरम्यान, भाजपश्रेष्ठींनी सुमलता यांना राज्यसभेवर पाठविण्याचा विचार चालविल्याचे समजते.

Advertisement
Tags :
×

.