For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पेट्रोल गळती शोधण्यात अखेर यश

12:57 PM Dec 13, 2023 IST | Tarun Bharat Portal
पेट्रोल गळती शोधण्यात अखेर यश
Advertisement

दाबोळी जंक्शनवर आढळली भूमिगत गळती : खोदकाम करुन दुरुस्तीच्या कामास प्रारंभ

Advertisement

वास्को : मुरगाव बंदर ते झुआरीनगरातील तेल टाक्यांपर्यंत जाणारी पेट्रोल वाहिनी फुटल्याचे ठिकाण अखेर काल मंगळवारी सापडले. वास्कोतील माटवे दाबोळीत विहिरीच्या पाण्याने पेट घेतल्याने इंधन वाहिनीला गळती लागल्याचे जवळपास पंधरा दिवसांपूर्वी उघडकीस आले होते. आल्त दाबोळीतील नौदलाच्या डेपोसमोरील रस्त्याखाली वाहिनी फुटल्याचे आढळून आले असून या वाहिनीच्या तात्पुरत्या दुरूस्तीकामासही सुरुवात झाली आहे. संपूर्ण वाहिनीच्या सर्वेक्षणानंतर पूर्ण दुरूस्तीचे काम सुरू होणार आहे. पंधरा दिवसांपूर्वी माटवे दाबोळीतील एका विहिरीच्या पाण्याने पेट घेतला होता. त्यानंतर या गावातील सर्वच विहिरी, कूपनलिका व इतर जलस्त्रोत इंधनाने प्रदूषित झाल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे या गावापासून सुमारे सहाशे मीटर अंतरावर डोंगरमाथ्यावर असलेल्या इंधन वाहिनीला गळती लागल्याचे स्पष्ट झाले होते. या प्रकरणाने वास्कोत बारा वर्षांनंतर पुन्हा खळबळ निर्माण झाली होती. स्थानिक पंच निलम नाईक यांनी या प्रकरणी जबाबदार व्यक्तीविरुद्ध कारवाईसाठी वास्को पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती.

नौदलाच्या डेपोसमोर सापडली गळती

Advertisement

या इंधन गळतीमुळे माटवे गावात असुरक्षितता पसरली आहे. इंधन गळतीचे ठिकाण शोधून काढण्यासाठी तात्काळ मोहीम सुरू करण्यात आली होती. परंतु गळती शोधून काढण्यासाठी शोध पथकाला पंधरा दिवस लागले. काल मंगळवारी दुपारी आल्त दाबोळीतील वालीस जंक्शन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाक्यावर नौदलाच्या डेपोसमोर भूमिगत वाहिनीला गळती सापडली. गळती आढळून आल्यानंतर मुरगावचे उपजिल्हाधिकारी भगवंत करमली तसेच मामलेदार प्रविणजय पंडित यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली.

 बावीस वर्षांची जुनी इंधनवाहिनी

ही इंधन वाहिनी बावीस वर्षे जुनी असून त्या वाहिनीने गंज पकडल्यानेच तिला गळती लागल्याचे उघडकीस आले आहे. ही वाहिनी दुरूस्त करण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. वाहिनीला गळती लागल्याचे उघडकीस आल्याने वाहिनी वापरण्यास सध्या बंदी घातली आहे. ही इंधन वाहिनी इंधन वाहण्यासाठी पूर्ण सुरक्षित असल्याची खात्री पटल्यानंतरच प्रशासनाकडून पुन्हा वाहिनी वापरण्यासाठी परवानगी मिळणार आहे.

 इंधन वाहिनीचे होणार सर्वेक्षण

झुआरीनगरातील ज्या इंधन टाक्यांना या वाहिनीतून इंधन पुरवठा होतो, त्या झेडआयओए प्रा. लि. चे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवप्रसाद नायक यांनी दिलेल्या माहितीनुसार इंधन वाहिनीतील गळती शोधण्यासाठी सतत पंधरा दिवस अथक प्रयत्न करण्यात आले. त्यासाठी गोव्यातील व गोव्याबाहेरील खासगी आस्थापनांचीही मदत घेण्यात आली. सार्वजनिक बांधकाम खात्यानेही या कामात सहकार्य केले. एमईएस कॉलेज परिसर ते दाबोळीतील विशाल मेगा मार्टपर्यत तीन किलोमीटरची वाहिनी गळती शोधण्यासाठी खोदण्यात आली होती. गळती सापडत नव्हती. परंतु या कामात गुंतलेल्या पथकाने अशा सोडली नाही. शेवटी त्यांच्या प्रयत्नांना यश आल्याचे सांगून त्यांनी या कामात सहकार्य केलेल्या सर्वांचे आभार मानले.

 मलेशियाहून येणार तज्ञ पथक

नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार फुटलेल्या वाहिनीची दुरूस्ती करण्यात आल्यानंतर संपूर्ण चौदा किलोमीटर अंतराच्या इंधन वाहिनीचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यासाठी याच आठवड्यात मलेशियाहून खास पथक गोव्यात दाखल होणार आहे. सदर इंधन वाहिनी स्टीलची असल्याने ती गंजण्याची शक्यता असल्याचे ते म्हणाले.

 माटवे दाबोळीतील धोका कायम

इंधन गळतीचे ठिकाण आढळून आल्याने झेडआयओए कंपनीचा प्रश्न मिटला आहे. कंपनी आता या निमित्ताने पूर्ण इंधन वाहिनीचे सर्वेक्षण करणार आहे. सुरक्षेची खात्री पटेपर्यंत ही वाहिनी बंद राहणार आहे. या वाहिनीच्या जागी नवीन वाहिनीही घातली जाऊ शकते. मात्र, सध्या माटवे दाबोळीतील इंधन प्रदूषणाचा प्रश्न अनुत्तरीत राहिलेला आहे. आल्त दाबोळीतील वालीस जंक्शन हा भाग माटवे दाबोळीच्या डोंगरावरचा भाग आहे. त्यामुळे वाहिनीला गळती लागून इंधन नैसर्गिकरित्या खालच्या गावात जमिनीतील झऱ्यांना मिळण्याची शक्यता आहे. अन्य काही ठिकाणीही गळती असण्याची शक्यता लोकांमध्ये व्यक्त होत आहे.

 आग भडकण्याची भीती अजूनही

माटवे गावातील लोकांमध्ये अद्यापही आग भडकण्याची भीती आहे. सर्वच जलस्त्रोत इंधनाने प्रदूषित झाल्याने लोकांना या जमिनीतील पाण्याचा वापरही करता येत नाही. ओहोळ आणि शेतजमिनीतही इंधन झिरपलेले आहे. हे प्रदूषण मिटवण्याचा मोठा प्रश्न आहे. यासंबंधी बोलताना कंपनीचे अधिकारी शिवप्रसाद नायक यांनी गावातील विहिरी व इतर ठिकाणी वाहून येणारे इंधन काढण्याचे काम कंपनीचे पथक सुरूच ठेवणार आहे, तसेच धोका दूर होत नाही तोपर्यंत गावावर लक्ष ठेवणार असल्याचे स्पष्ट केले.

Advertisement
Tags :

.