अखेर कोरटकरला तेलंगणातून अटक
कोल्हापूर
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी अक्षेपार्ह वक्तव्ये करीत, इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी दिल्या प्रकरणी संशयित प्रशांत कोरटकर याला अखेर तेलंगणातून अटक करण्यात आली.
गेल्या काही दिवसांपासून संशयित प्रशांत कोरटकर याचे काही फोटो व्हायरल झाले होते. तसेच ते दुबईला पळून गेल्याचाही दावा करण्यात आला होता. मात्र शोध घेत असलेल्या पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी कोरटकरने आपला जुना फोटो शेअर केल्याची माहिती पुढे आली होती. तसेच ते महाराष्ट्रातच असल्याचीही शक्यता वर्तविली जात होती. दरम्यान कोरटकर विरोधात लुक आऊट नोटीस जारी करण्यात आली होती. कोल्हापूरच्या सत्र न्यायालयाने कोरटकरचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याने त्याच्यावर अटकेची टांगती तलवार होती. कोरटकरच्या पत्नीनेही त्याचा पार्सपोर्ट अधिकृतरित्या पोलिसांकडे जमा केला होता. इंद्रजीत सावंत यांनी कोल्हापूर पोलिसांना लेखी अर्ज सादर करत, कोरटकरच्या पासपोर्टवर तात्काळ कारवाईचीही मागणी केली होती. अखेर आज (दि. २४) मार्च रोजी संशयित प्रशांत कोरटकर याला तेलंगणा येथून अटक झाली.