For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अखेर इनाम बडस भागात बससेवा सुरू

12:05 PM Feb 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
अखेर इनाम बडस भागात बससेवा सुरू
Advertisement

राज्य परिवहन मंडळाकडे दिले होते निवेदन : ग्रामस्थ-प्रवाशांतून समाधान

Advertisement

वार्ताहर/किणये 

इनाम बडस, बिजगर्णी व बेळवट्टी भागात अपुऱ्या व अनियमित बससेवेमुळे प्रवासी व विद्यार्थी वर्गांचे हाल होऊ लागले. बससेवेचा बोजवारा उडाला होता. बस थांब्यावर तासन्तास बसची वाट पाहत ताटकळत बसावे लागत होते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान अधिक प्रमाणात होत असल्याच्या तक्रारी पालक वर्गातून करण्यात आल्या. या भागात बससेवेचा अक्षरश: बोजवारा उडाला होता. या भागात नियमित बससेवा सुरू करण्यासाठी राज्य परिवहन मंडळाच्या अधिकाऱ्यांना बिजगर्णी ग्रामपंचायतच्या वतीने निवेदन देण्यात आले. याचे सविस्तर वृत्त ‘तरुण भारत’ मधून प्रसिद्ध करण्यात आले. या वृत्ताची व निवेदनाची दखल घेऊन अखेर इनाम बडस गावात राज्य परिवहन मंडळाकडून बससेवा सुरू करण्यात आली आहे.

Advertisement

बिजगर्णी गावाला एकही बस नाही. तसेच इनाम बडस गावालाही बस नव्हती. किणये भागातील केवळ एक बससेवा इनाम बडस गावाला येत असे. त्यामुळे या भागातील विद्यार्थ्यांना शाळा, कॉलेजला वेळेवर पोहोचता येत नव्हते. त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे, अशी माहिती पालकांनी दिली. या भागातील शेतकरी बेळगावला विविध कामानिमित्त व बाजारासाठी येतात. मात्र अनियमित व अपुऱ्या बसफेऱ्यांमुळे त्यांना बसथांब्यावर बसून राहावे लागत होते. गोल्याळी व बाकनूर गावाला येणाऱ्या बसमध्ये प्रवाशांची गर्दी अधिक असते. त्यामुळे इनाम बडस, बिजगर्णी, बेळवट्टी भागातील प्रवाशांना या बसमध्ये जागाच मिळत नाही. विद्यार्थ्यांना शाळा, कॉलेजमध्ये वेळेवर पोहोचता येत नाही. तसेच शाळा सुटल्यानंतर घरी यायलाही रात्री उशीर होत असल्याची माहिती पालकांनी दिली आहे.

या भागात एक नवीन बस सुरू करण्यात यावी. तसेच सकाळी आठ ते नऊच्या दरम्यान व दुपारी साडेचार ते साडेपाचच्या दरम्यान बसफेरी असणे गरजेचे आहे, अशीही निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली. राज्य परिवहन मंडळाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. निवेदन देताना ग्रा.पं. अध्यक्षा रेखा नाईक, मनोहर बेळगावकर, उपाध्यक्ष महेश पाटील आदींसह या भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. इनाम बडस भागातील बस अपुऱ्या व अनियमित बसफेऱ्यांमुळे प्रवाशांचे होणारे हाल याबाबत ‘तरुण भारत’मधून आवाज उठविण्यात आला. त्यामुळे राज्य परिवहन मंडळाच्या अधिकाऱ्यांनी इनाम बडस गावाला नवीन बससेवा सुरू करून दिली आहे.

बससेवेचा शुभारंभ...

या बससेवेचा नुकताच शुभारंभ करण्यात आला. सोमवारी बसमधील वाहक व चालक या दोघांचाही फेटा बांधून इनाम बडस ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. बसचे पूजन मनोहर बेळगावकर, सचिन बाळेकुंद्री, मनोहर पाटील, अशोक कांबळे, गीतेश ठाणब, रामू पाटील, कल्लाप्पा पाटील, बळीराम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. बसफेरी सुरू करण्यासाठी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचेही सहकार्य मिळाल्याची माहिती मनोहर बेळगावकर यांनी दिली. या भागात नवीन बसफेरी सुरू करण्यात आली असल्यामुळे प्रवासी व विद्यार्थी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

Advertisement
Tags :

.