अखेर मराठी विषय शिक्षक भरतीला मान्यता
पाठपुराव्याला आले यश, विधान परिषद सदस्यांचा दुजोरा
त. भा. प्रतिनिधी/ बेळगाव
राज्यातील शिक्षक भरतीमध्ये मराठी विषय शिक्षकांनाही आता स्थान मिळणार आहे. राज्य सरकारने मागील दोन दिवसांत झालेल्या सततच्या बैठकांनंतर उर्दू व मराठी अशा दोन्ही विषय शिक्षकांच्या 1 हजार जागा भरण्याची मान्यता दिली आहे. यापैकी मराठी विषय शिक्षकांच्या राज्यात 200 जागा काढल्या जाणार आहेत. या वृत्ताला मराठी विषय शिक्षकांसाठी पाठपुरावा करणाऱ्या विधान परिषद सदस्य मारुतीराव मुळे यांनी दुजोरा दिला आहे.
मराठी, उर्दू विषय शिक्षकांच्या अनेक जागा रिक्त असतानाही राज्य सरकारकडून केवळ कन्नड व इंग्रजी विषय शिक्षकांसाठी भरती प्रक्रिया राबविली. एकूण 15000 शिक्षकांची भरती केली जाणार होती. बेळगाव, बिदर, बागलकोट, विजापूर या जिल्ह्यातील मराठी विषय शिक्षकांची पदे रिक्त असतानाही राज्य सरकारकडून दुर्लक्ष करण्यात आल्याने डीएड, बीएड उत्तीर्ण उमेदवारांमधून नाराजी व्यक्त केली जात होती.
1 हजार शिक्षकांच्या जागा भरण्यास मान्यता
भरती प्रक्रियेसंदर्भात शुक्रवारी दिवसभर बेंगळूर येथे अनेक घडामोडी घडल्या.
उर्दू व मराठी विषय शिक्षकांसाठी सत्ताधारी व विरोधी पक्षातील अनेक नेते बेंगळूरमध्ये ठाण मांडून होते. त्यामुळे राज्य सरकारने 1 हजार शिक्षकांच्या जागा भरण्यास मान्यता दिली. यामध्ये उर्दूसाठी 800 तर मराठी विषय शिक्षकांसाठी 200 जागा भरण्यास मान्यता देण्यात आली आहे. मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी ही मंजुरी दिल्याचे सांगण्यात येत आहे.
येत्या दोन दिवसांत नवीन अध्यादेश येण्याची शक्यता
काही डीएड्, बीएड् उमेदवारांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू केला होता. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे. याबाबतचा नवीन अध्यादेश येत्या दोन दिवसांत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे उमेदवारांना आता या नव्या अध्यादेशाची प्रतीक्षा आहे.