अखेर सक्रिय !
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मान्सूनच्या वाऱ्यांना अधिक बळ मिळाले असून पुढील काही दिवसही मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक, गोव्यात यंदाचा मान्सून उशिरा पण दमदारपणे सक्रिय झाला असून सलग पाचव्या दिवशीही पावसाचा जोर कायम आहे. कोकण, घाटमाथा आणि दक्षिण महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली असून मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, पुणे, सातारा, रत्नागिरी आणि आसपासच्या भागांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मान्सूनच्या वाऱ्यांना अधिक बळ मिळाले असून पुढील काही दिवसही मुसळधार पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे हा केवळ हवामानाचा विषय राहिलेला नसून प्रशासन, नागरिक आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांच्या सज्जतेची मोठी परीक्षा बनला आहे. आधी तो वेगळ्या पद्धतीचे जलसंकट होता! मुंबईत 24 तासांत दोनशे ते अडीचशे मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. परिणामी अनेक सखल भाग जलमय झाले, वाहतुकीचा वेग मंदावला आणि जनजीवन विस्कळीत झाले. दुसरीकडे रायगड, माथेरान, ताम्हिणी, लोणावळा आणि घाट परिसरात तीनशे ते चारशे मिलिमीटरपर्यंत पावसाची नोंद झाली. भूस्खलन, दरडी कोसळणे आणि अचानक पूर येण्याचा धोका वाढला आहे. खोपोली येथील झेनिथ धबधब्यावर अडकलेल्या शंभरहून अधिक पर्यटकांची स्थानिक ग्रामस्थांनी केलेली सुटका ही धाडसाची प्रेरणादायी घटना असली, तरी अशा घटनांमधून पर्यटकांनीही निसर्ग पर्यटन करताना जबाबदारीने वागण्याची गरज स्पष्ट होते. बेळगाव सीमाभाग, सांगली, कोल्हापूर, सातारा आणि रत्नागिरी या भागांतही पावसाने जोर धरला आहे. वारणा, पंचगंगा, दूधगंगा, वेदगंगा, कृष्णा आणि कोयना नदी खोऱ्यातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे. कोयना धरणासह परिसरातील जलाशय वेगाने भरत आहेत. शेतकऱ्यांसाठी ही दिलासादायक बाब असली, तरी अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान, मृदधूप, जनावरांचे स्थलांतर आणि ग्रामीण संपर्क तुटण्याचा धोका वाढतो. विशेषत: सांगली आणि कोल्हापूर जिह्यांनी 2019 आणि 2021 च्या महापुराचे भीषण अनुभव घेतले असल्याने यंदा अधिक सतर्कता आवश्यक आहे. गोवा आणि बेळगाव परिसरातही मुसळधार पावसामुळे महामार्ग, घाटरस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. आंबोली, आंबा, अनस्कुरा, फोंडा, चोर्ला यांसारख्या घाटमार्गांवर दरडी कोसळण्याचा धोका कायम आहे. अशा परिस्थितीत पर्यटनापेक्षा सुरक्षिततेला प्राधान्य देणे ही काळाची गरज आहे. सोलापूरसारख्या कमी पावसाच्या जिह्यासाठी हा मान्सून दिलासादायक ठरत असला, तरी उजनी धरणाच्या पाणलोटात होणाऱ्या पावसावरच जिह्याचे भवितव्य अवलंबून आहे. भीमा खोऱ्यातील पावसामुळे उजनीत पाणीसाठा वाढण्याची आशा निर्माण झाली आहे. त्यामुळे दुष्काळाच्या छायेतून बाहेर पडण्याची संधी निर्माण झाली असली, तरी पाण्याचे नियोजन आणि काटकसरीने वापर याकडे दुर्लक्ष होता कामा नये. या संपूर्ण परिस्थितीत प्रशासनाची भूमिकाही तितकीच महत्त्वाची आहे. हवामान विभागाच्या अचूक इशाऱ्यांनुसार जिल्हा प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा, राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती प्रतिसाद पथके सतर्क आहेत. मात्र केवळ सरकारी यंत्रणांवर अवलंबून राहून चालणार नाही. नागरिकांनीही अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचना पाळणे, नदी-नाले, धबधबे आणि पूरग्रस्त भागांपासून दूर राहणे, तसेच आवश्यकतेशिवाय प्रवास टाळणे ही सामूहिक जबाबदारी आहे. मान्सून हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे. शेती, पिण्याचे पाणी, वीज निर्मिती आणि उद्योग या सर्वांची गती पावसावर अवलंबून असते. त्यामुळे पाऊस हा आनंदाचा विषय असला तरी त्याचे रूपांतर संकटात होऊ नये यासाठी नियोजन, शिस्त आणि वैज्ञानिक दृष्टिकोन आवश्यक आहे. हवामान बदलामुळे अतिवृष्टीच्या घटना वाढत असल्याचे वास्तव आता स्वीकारावे लागेल. त्यामुळे शहरांतील जलनिस्सारण व्यवस्था, नदीपात्रांचे संवर्धन, डोंगर उतारांचे संरक्षण आणि अनधिकृत बांधकामांवर कठोर नियंत्रण ही भविष्यातील अपरिहार्य पावले आहेत. यंदाचा पाऊस महाराष्ट्रासाठी जलसंपन्नतेची संधी घेऊन आला आहे. मात्र ही संधी निष्काळजीपणामुळे संकटात बदलू नये, यासाठी सरकार, स्थानिक प्रशासन आणि नागरिक यांनी एकत्रितपणे जबाबदारी पार पाडणे आवश्यक आहे. निसर्गावर विजय मिळवणे शक्य नाही; मात्र निसर्गाशी सुसंवाद साधत सज्ज राहणे नक्कीच शक्य आहे. हाच यंदाच्या मुसळधार पावसाचा सर्वात मोठा संदेश आहे.