अखेर (तात्पुरती) शस्त्रसंधी
अमेरिका आणि इराण यांनी 39 दिवस चाललेल्या युद्धानंतर शस्त्रसंधीची घोषणा केली आहे. यामुळे जगाने सुटकेचा नि:श्वास टाकला. आता ही शस्त्रसंधी स्थायी राहील, हे पाहण्याचे उत्तरदायित्व सर्व संबंधित देशांचेच आहे.
अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात 39 दिवस चाललेले युद्ध अखेर 40 व्या दिवशी 14 दिवसांची शस्त्रसंधी घोषित करण्यात आली आहे. त्यामुळे जगाने सुटकेचा नि:श्वास टाकला. या युद्धामुळे अनेक देशांच्या इंधन पुरवठ्यात खंड पडला. अर्थव्यवस्थेची हानी झाली. शस्त्रसंधीमुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणारा इंधन पुरवठा सुरळीत होण्याची शक्यता आहे. या शस्त्रसंधीचा परिणाम त्वरित जगाच्या शेअरबाजारांवर दिसून आला. भारतातही मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक 2,900 ने वधारला. हे युद्ध थांबण्याची जग किती आतुरतेने प्रतीक्षा करीत होते, हे यावरुन दिसून आले. कच्च्या इंधन तेलाच्या दरातही 20 डॉलर्स प्रतिबॅरलने घट झाली. ही शस्त्रसंधी प्रदीर्घ काळ चालेल आणि ती युद्धबंदीत परिवर्तीत होईल, अशी जगाची अपेक्षा आहे. ती पूर्ण होईल की नाही, हे मात्र आत्ताच सांगता येणार नाही. कारण नव्या वृत्तानुसार, शस्त्रसंधी झाल्यानंतर काही तासांमध्येच इराणने पुन्हा कुवेत आणि संयुक्त अरब अमिरातीच्या तेलसाठ्यावर हल्ला केला आहे. या घटनेवरुन ही शस्त्रसंधी किती अनिश्चित आणि अस्थिर आहे, याचा प्रत्ययही त्वरीत आला. आता अमेरिका आणि इराण हे दोन्ही देश शस्त्रसंधी आपल्याच अटींवर कशी झाली आहे, हे ठसविण्याच्या मागे लागले आहेत. तसेच, 39 दिवस चाललेल्या युद्धात कोणाचा विजय झाला, नैतिक विजय कोणाचा, कोणी प्रथम माघार घेतली आदी मुद्द्यांवर यापुढे काही दिवस जगात आणि विशेषत: भारतात आपापल्या राजकीय कलानुसार मतप्रदर्शन होईल. पण त्याला फारसा अर्थ असणार नाही. मुळात हे युद्ध, ते करणाऱ्यांनी प्रतिष्ठेचा विषय बनविले होते. त्यामुळे ते अपेक्षेपेक्षा अधिक काळ लांबले. तसेच, या युद्धात अमेरिका आणि इस्रायल यांच्या बाजूने किंवा इराणच्याही बाजूने कोणताही देश थेट उतरला नाही. अन्यथा, त्याला जागतिक युद्धाचे स्वरुप प्राप्त होऊन संपूर्ण जगाचीच घडी विस्कटली असती. तसे झाले नाही. कारण हे युद्ध करणाऱ्या देशांपेक्षा, इतर देशांनीच खूप समंजसपणा दाखविला. स्वत: कोणत्यातरी बाजूने या युद्धात पडून त्याची व्याप्ती वाढविली नाही. ही या युद्धाची खऱ्या अर्थाने सकारात्मक अशी फलनिष्पत्ती आहे. या युद्धात सर्वाधिक हानी इराणची झाल्याचे दिसून येते. सर्वाधिक नागरीक त्याच देशाचे मारले गेले. इराणने इस्रायल, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात, कुवेत, कतार आदी देशांवर अनेक क्षेपणास्त्रे आणि ड्रोन्स डागली. तथापि, त्या देशांची प्रत्यक्ष हानी तुलनेने बरीच कमी झाल्याचेही आकडेवारीवरुन समजते. इराणने अणुबाँब बनवू नये, म्हणून हे युद्ध करण्यात आल्याचे अमेरिकेचे आणि इस्रायलचे म्हणणे आहे. हे युद्ध करण्याची कारणेही प्रत्येकवेळी भिन्न भिन्न सांगण्यात आली. पण इराणची अणुबाँब बनविण्याची शक्ती नाहीशी करणे, हे एकच कारण युद्धाला प्रारंभ झाल्यापासून शस्त्रसंधीपर्यंत समान राहिले. त्यामुळे तेच खरे असावे, असे मानण्यास जागा आहे. पण हा उद्देश पूर्ण झाला आहे काय आणि असेल तर किती प्रमाणात, हे समजण्यास सध्यातरी मार्ग नाही. या युद्धाचे भारतात राजकीय पडसाद कसे उमटले, यावर दृष्टीक्षेप टाकणे मनोरंजक ठरेल. अनेक विरोधी नेत्यांनी आणि विचारवंतांनी प्रतिक्रिया दिल्या. भारताने इराणची बाजू उघडपणे घेतली पाहिजे, असे काहींचे म्हणणे होते. भारत सरकार अमेरिका आणि इस्रायल यांचा निषेध का करत नाही, असा संतप्त प्रश्न काहींना पडला. भारताचे मौन त्याच्या दुर्बलतेचे लक्षण आहे, अशी टीका झाली. ‘विश्वगुरु“ हे युद्ध थांबवत का नाहीत, अशी खोचक पृच्छाही झाली. परंतु, भारताने हे युद्ध थांबविण्यासाठी नेमके काय करावे, हे मात्र कोणीही स्पष्ट केले नाही. हे युद्ध भारताचे नाही. त्यामुळे कोणाचीही बाजू न घेण्याचे धोरण योग्यच आहे, असे दोन चार शहाणे सूर काही विरोधी नेत्यांकडून उमटले, ही बाब समाधानकारक मानली पाहिजे. हे युद्ध थांबविण्यासाठी पाकिस्तानने मध्यस्थी केली आणि पाकिस्तानातच पुढची चर्चा होणार आहे, असेही वृत्त प्रसिद्ध झाले आहे. पण या शस्त्रसंधीचा खरा सूत्रधार चीन आहे आणि पाकिस्तानचा उपयोग चीनच मध्यस्थ म्हणून करुन घेत आहे, अशीही चर्चा आहे. यावरुनही भारतात काही प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काही नेत्यांच्या मते यामुळे पाकिस्तानची प्रतिष्ठा वाढणार आहे. त्यामुळे भारताची प्रतिष्ठा कमी होणार आहे आणि यासाठी ‘विश्वगुरु’ पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार आहेत, असेही त्यांचे म्हणणे आहे. पण, हे युद्ध लवकर थांबवा. युद्धामुळे प्रश्न सुटणार नाही. चर्चेचा मार्गच योग्य आहे, हे भारत पहिल्या दिवसापासून सांगत होता. 39 दिवस एकमेकांना ओरबाडल्यानंतर अखेर युद्धमान देशांना हे पटले. त्यांनी शस्त्रसंधी केली. याचा अर्थ, ‘विश्वगुरु“ जे म्हणत होते तेच खरे ठरले. कोणताही गुरु (त्यात विश्वगुरुही आले) योग्य विचार व्यक्त करत असतो. तो मध्यस्थी करत नसतो. मध्यस्थी करणाऱ्याला प्रतिष्ठा मिळते असेही नाही. त्यामुळे या टीकेला फारसा अर्थ नाही. काहीही असले, तरी युद्ध थांबले हे चांगले झाले. आता ते पुन्हा होऊ नये, याची दक्षता सर्व संबंधितांनी घ्यावी, ही अपेक्षा आहे.