अखेर कॅन्टोन्मेंटमध्ये नवे सीईओ रुजू
रखडलेली कामे मार्गी लागण्याची शक्यता
बेळगाव : कॅन्टोन्मेंट बोर्डच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा राजीव कुमार यांनी सोमवारी पदभार स्वीकारला. पहिल्याच दिवशी त्यांनी कर्मचारी व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन बेळगावमध्ये सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा घेतला. तब्बल दीड महिन्याच्या प्रतीक्षेनंतर राजीव कुमार बेळगावमध्ये दाखल झाले आहेत. कॅन्टोन्मेंटचे माजी सीईओ के. आनंद यांच्या मृत्यूनंतर कायमस्वरुपी सीईओ मिळाले नव्हते. मध्यंतरी आलेल्या सीईओंकडे प्रभारी जबाबदारी देण्यात आली होती. 1 डिसेंबर रोजी राजीव कुमार यांच्या नियुक्तीचा आदेश बजावला होता. अखेर शनिवार दि. 13 रोजी ते बेळगावमध्ये दाखल झाले. सोमवारी त्यांनी सीईओपदाचा कार्यभार स्वीकारून कामाला सुरुवात केली. कायमस्वरुपी सीईओ मिळाले, परंतु मागील दोन महिन्यांमध्ये रखडलेली कामे पूर्ण करण्याचे आव्हान नवीन सीईओंसमोर असणार आहे. आधीच मागील काही प्रकरणांमध्ये कॅन्टोन्मेंट बोर्डला नामुष्की सहन करावी लागली होती. त्यामुळे यापुढील काळात तरी बोर्डचा स्वच्छ कारभार राहणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. सोमवारी पदभार स्वीकारताच त्यांनी कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन सर्व कामे वेळेवर पूर्ण झाली पाहिजेत, असे स्पष्ट केले. कॅन्टोन्मेंटमधील विविध विभागांचे प्रमुख मराठी, कन्नड व उर्दू शाळांचे मुख्याध्यापक, तसेच हॉस्पिटलमधील डॉक्टर्स यांची संयुक्त बैठक घेण्यात आली.