कुडचडेत अखेर सोहम नाईकवर गुन्हा
अटकेची मागणी करत जमाव पोलिसस्थानकावर : तक्रार नसल्याच्या कारणावरुन पोलिसांची चालढकल
कुडचडे : सोळापेक्षा जास्त अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण करून त्यांचे अश्लील व्हिडिओ काढून ते व्हायरल करण्याचा आरोप असलेल्या माधेगाळ-कुडचडे येथील सोहम नाईक या युवकावर काल रविवारी रात्री कुडचडे पोलिसांनी गुन्हा नोंद केल्याची माहिती कुडचडेचे पोलिस निरीक्षक मेल्सन कुलासो यांनी दिली. दरम्यान, याप्रकरणी ज्या अल्पवयीन मुलांचे लैंगिक शौषण करण्यात आल्याचा आरोप होत आहे, त्यापैकी कुणीही अद्याप अधिकृत तक्रार नोंद केलेली नाही. एका वृत्तपत्राने या लैंगिक शोषणाचे वृत्त दिल्यानंतर स्थानिक लोकांनी हा विषय लावून धरला आहे. काल रविवारी सकाळपासूनच नागरिक कुडचडे पोलिसस्थानकावर जमले होते. त्यांनी निरीक्षक मेल्सन कुलासो यांची भेट घेऊन लैंगिक शोषण करणाऱ्या युवकावर गुन्हा नोंद करून त्याला अटक करावी, अशी मागणी लावून धरली होती.
अगोदर तक्रार द्या, नंतर अटक करतो
या लैंगिक शोषण प्रकरणात पीडित असलेल्या अल्पवयीन मुलींपैकी एकीने तरी तक्रार देण्यास पुढे यावे व तक्रार द्यावी, आम्ही संशयित आरोपीला त्वरित अटक करतो अशी भूमिका निरीक्षक मेल्सन कुलासो यांनी घेतली आहे. जोपर्यंत अधिकृत तक्रार दाखल होत नाही, तोपर्यंत संशयिताला अटक करणे कठीण असल्याचे त्यांनी उपस्थित जमावाला सांगितले. नंतर ज्या पत्रकाराने हे वृत्त दिले होते, त्याला पाचारण करून या लैंगिक शोषणाची पोलिसांनी खातरजमा करून घेतली. तसेच त्या पत्रकाराचे म्हणणे नोंद करून घेतल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंद करून घेण्याची प्रक्रिया सुरू केली.
संशयिताला अगोदरच ताब्यात घेतले होते
कुडचडे पोलिसांनी या लैंगिक शोषण प्रकरणातील संशयित सोहम नाईक याला अगोदरच ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरू केली होती. मात्र, पोलिसांनी त्या संदर्भात कमालीची गुप्तता ठेवली होती. एका बाजूने स्थानिक लोक एकत्र येऊन त्याच्या अटकेची मागणी करत होते, तर दुसऱ्या बाजूने पोलिस संशयिताची चौकशी करत होते. त्याचा मोबाईलही पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यातून महत्त्वाची माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला.
सुमारे 200 जणांचा जमाव एकत्र आला
हे लैंगिक शोषण प्रकरण खूपच गंभीर असल्याने कुडचडेतील जागरूक नागरिक एकत्र आले. त्यात दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीचे अध्यक्ष सिद्धार्थ गांवस देसाई, पुष्कल सावंत, आनंद प्रभुदेसाई, विनेश प्रभुदेसाई, किशन सावंत, विकास भगत, प्रदीप काकोडकर इत्यादीचा समावेश होता. या सर्वांनी पोलिस निरीक्षक मेल्सन कुलासो यांना धारेवर धरले. रात्री उशिरा पर्यंत लोकांचा जमाव पोलिस स्थानकाच्या बाहेर होता व त्यांनी अटकेची मागणी लावून धरली होती. पत्रकारांच्या जबानी नोंद करून घेतल्यानंतर पोलिसांनी अगोदर गुन्हा नोंद करून घेतला व नंतर संशयित सोहम नाईकच्या अटकेची प्रक्रिया सुरू केली होती.
पोलिसांनी स्वत:हून गुन्हा नोंदवून अटक करावी
या प्रकरणात जरी पीडित युवती तक्रारी देत नसतील तर पोलिसांनी स्वत:हून गुन्हा नोंद करावा, पोलिसांना तेव्हढा अधिकार असल्याचे सांगितले. पीडित युवतींची बदनामी होणार असल्याने, त्या तक्रार देण्यास पुढे येणार नाहीत तसेच लाज लज्जेपोटी टोकाचा निर्णय घेऊन आत्महत्यासारखे प्रकार घडू शकतात याकडे जमावातील नेत्यांनी पोलिसांचे लक्ष वेधले.