अखेर अपहरण - खंडणीचा गुन्हा दाखल
फक्त ‘तरुण भारत’चा सुरू होता पाठपुरावा
पेट्री फाट्यावर कारमध्ये बसवून मारहाण
सातारा
घटना घडल्याच्या दुसऱ्याच दिवशी ‘तरुण भारत’ने कासचं लफडं प्रकाशझोतात आणलं. त्यानुसार पीडित युवकाने अखेर दि. 10 रोजी घडलेल्या घटनेवरुन ती महिला आणि तिचे साथीदार यांच्यावर दि. 15 रोजी दुपारी सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. फिर्याद देणारा मतकर कॉलनी परिसरातील युवक आहे. त्याने एक महिला व चार अनोळखी व्यक्तींवर अपहरण व खंडणी मागणी केल्याचा गुन्हा नोंद केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मतकर कॉलनी येथे राहणारा किरण जाधव याची आणि संबंधित महिलेशी ओळख व्हॉट्सअपद्वारे झाली आहे. त्या महिलेने फोनवरुन ओळख वाढवून सेंटरिंगचे काम देते अशी बतावणी करत पेट्री गावच्या हद्दीत घेवून जावून तेथे सेंटरिंगचे काम दाखवून कासला जावू असे बोलून एकीव फाट्याजवळ असलेल्या लॉजवर दोघांच्या संमतीने शारीरिक संबंध आले. तेथून कासला फिरायला जावून परत पेट्री फाट्यावर दोघे आले. तेव्हा त्या महिलेने अनोळखी चार जणांना तेथे बोलवले होते. त्यांनी किरण जाधव यास काही कळायच्या आत पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये जबरदस्तीने बसवले. मारहाण करत त्यास वेचले गावच्या हद्दीत घेवून गेले. तेथे एका खोलीत नेवून सायंकाळी 5.30 वाजता डांबून ठेवले. किरण जाधव याची सर्व कपडे काढून त्यांनी लाथाबुक्यांनी आणि दांडक्यांनी मारहाण करत आमच्या बहिणीला लॉजवर घेवून जाण्याची तुझी हिंमत कशी झाली. तुला जिवंत ठेवणार नाही, असे म्हणत ते मारहाण करत होते. ते चौघे मारत असताना ती महिला ओरडून म्हणाली, तु आम्हाला पैसे देत नाही तर तुझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करेन, असे म्हणल्यावर किरण जाधवला खात्री झाली की ते सगळे एकत्रच असून गुन्हा दाखल करण्याची भीती दाखवून धमकी देत पैसे मागत आहेत. तुला यातून वाचायचे असेल तर पंधरा लाख रुपये घेवून येण्यास कोणाला तरी सांग असे म्हणून मारहाण केली. त्याबाबत किरण याने त्याच्या पत्नीला पैसे घेवून येण्यास सांगितले. किरण जाधव याच्या पत्नीने शेजारच्या युवकास 3 लाख रुपये घेवून वेचले येथे पुलावर पाठवले असता तेथे अनोळखी चार जणांनी पैसे घेतले. तसेच त्यातल्या लाल शर्ट घातलेल्या एकाने राहिलेले दोन लाख रुपये उद्या नाही दिले तर तुझा व्हिडीओ व्हायरल करेन आणि बलात्कार केल्याची खोटी केस करेन आणि तुला अडकवीन अशी धमकी दिली.
त्यावरुन सातारा तालुका पोलीस ठाण्यात ती महिला आणि अन्य चार जण असा पाच जणांवर अपहरण व खंडणीचा गुन्हा दाखल केलेला आहे. घटनास्थळी डीवायएसपी यांनी भेट दिली आहे. याचा तपास महिला पोलीस नाईक तांबे या करत आहेत.
‘तरुण भारत’कडूनच पुन्हा एक कांड उघड
जिल्ह्यातील निर्भिड दैनिक म्हणून ‘तरुण भारत’ची ओळख आहे. अनेक घटनांमधून ती पुन्हा पुन्हा सिद्ध झाली आहे. महामार्ग दुभाजक रातारोत फोडणे असो, बेकायदेशीर उत्खनन असो की दोन महिन्यापूर्वी झालेली कास पठारावरील बार बाला डान्स पार्टी असो. या सर्व घटना उघडकीस आणण्याचे काम तरुण भारतने केले आहे. आता पुन्हा एकदा कास परिसरात युवकाचे अपहरण करून गंभीर मारहाण केल्याचे कांडही ‘तरुण भारत’ने उघड केले असून याप्रकरणी अखेर गुन्हा दाखल झाला आहे.
दखल न घेणाऱ्या हॉस्पिटल-पोलिसांवर कारवाई काय?
दि. 10 फेब्रुवारी रोजी कास पठार परिसरातील पेट्री येथे किरण जाधव या युवकास अपहरण करून गंभीररित्या मारहाण केली तसेच त्याला खंडणी मागितल्याचे स्पष्ट झाले आहे. मारहाणीनंतर किरण जाधव साताऱ्यातील एका खासगी दवाखान्यात उपचार घेत होता. परंतु या घटनेची एमएलसीसुद्धा झाली नव्हती. तर पोलिसांनीही या घटनेकडे दुर्लक्ष केल्याचे प्रथमदर्शनी होते. त्यामुळे या संबंधित हॉस्पिटल व पोलिसांवर कारवाई काय होणार ?हे ही विचारले जात आहे.
कासला गुन्हेगारीचं ग्रहण लागतंय
जागतिक वारसा स्थळ असणारे कास पठार विविध प्रकारच्या फुलांसाठी जगप्रसिद्ध आहे. हा हंगाम सप्टेंबरच्या सुमारास असला तरी कासला आता बारमाही पर्यटन सुरू झाले आहे. पर्यटकांचा ओढा कायम असतो. त्यामुळेच सातारा कास रस्त्यावर शेकडो हॉटेल सुरू झाली आहेत. तसेच साताऱ्यातील अनेकजण पार्टीसाठी या हॉटेलमध्ये जातात. अनेकांच्या मद्यधुंद पार्टी सुद्धा येथे होतात. त्यातूनच अनेक मारामारीसारखे गुन्हे आजवर घडले आहेत. अलीकडे त्याचे प्रमाण वाढले असून त्यामुळेच कासला गुन्हेगारीचं ग्रहण लागल्याची भावना सातारकरांमध्ये बळावू लागली आहे.