कणबर्गीची निवासी योजना तातडीने निकालात काढा
बुडाच्या बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना
बेळगाव : शहरातील नवीन वसाहतींमधील समस्या सोडविणे, कणबर्गी येथे राबविण्यात येणारी नवीन निवासी योजना तातडीने पूर्ण करावी, याचबरोबर इतर विषयांवर बुडा कार्यालयात झालेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली आहे. सोमवारी ही बैठक झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे होते. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना जनतेची कामे प्रलंबित ठेवू नका, तातडीने निकालात काढा, अशी सक्त ताकीद दिली आहे.आमदार राजू सेठ यांनीही अधिकाऱ्यांना जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे सांगितले. काही वसाहतींची जबाबदारी अजूनही बुडाकडे आहे. त्यामुळे बुडाने तेथील समस्या सोडविण्यासाठी नियोजन करावे,
जनतेकडून तक्रारी येऊ नयेत, याची काळजी घ्यावी. महत्त्वाचे म्हणजे अनेकांना राहण्यासाठी घरे नाहीत. त्यामुळे त्यांना नवीन योजना राबवून त्यामधून जागा उपलब्ध करून दिली पाहिजे. त्यासाठी योग्यप्रकारे आराखडा तयार करून तो सादर करावा. जेणेकरून भविष्यात शहरातील प्रत्येक कुटुंबाला घरे मिळतील, तसेच प्रलंबित कामे तातडीने निकालात काढा, असे सांगितले. कणबर्गी येथे नवीन योजना राबविण्यासाठी अनेक वर्षे प्रयत्न केले जात आहेत. मात्र, ती योजना तडीस लागणे अवघड झाले आहे. त्यासाठी कायद्याच्या चौकटीत राहून ती योजना राबविण्यासाठी प्रयत्न करा, असे अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे यांनी सांगितले आहे. यावेळी बुडा आयुक्त शकील अहमद यांनी इतर अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करून जनतेची कामे निकालात काढण्याबाबत सूचना केली. या बैठकीला इतर अधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.