दिल्लीत अंतिम मतदार यादी जारी
1 कोटी 55 लाखाहून अधिक मतदार : लवकरच निवडणूक जाहीर होणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीमध्ये लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने सोमवारी अंतिम मतदार यादी जारी केली आहे. यावेळी 1 कोटी 55 लाखाहून अधिक मतदार स्वत:चा मतदानाचा हक्क बजावणार आहेत. आयोगानुसार दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या अंतिम मतदार यादीत एकूण 1,55,24,858 मतदार आहेत. यात 83 लाख पुरुष आणि 71 लाख महिला मतदार सामील आहेत. अंतिम मतदार यादी जारी झाल्यावर आता लवकरच निवडणुकीच्या तारखांची घोषणा होऊ शकते.
निवडणूक आयोगाकडून सध्या अनेक बैठका घेतल्या जात आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तारखेची घोषणा 10 जानेवारीपर्यंत होण्याची शक्यता आहे. प्रशासनाकडून निवडणूक तयारीचा आढावा यापूर्वीच घेण्यात आला असल्याने लवकरच यासंबंधी घोषणा होऊ शकते. परंतु सध्या तारखांबद्दल दिल्लीच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडुन कुठलीच माहिती देण्यात आलेली नाही.
फेब्रुवारीत संपतोय विधानसभेचा कार्यकाळ
दिल्लीच्या विधानसभेचा कार्यकाळ 23 फेब्रुवारी 2025 पर्यंत आहे. या तारखेपूर्वी दिल्ली विधानसभेची निवडणूक होणार आहे. याकरता दिल्लीच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून तयारी केली जात आहे. मागील विधानसभा निवडणुकीसाठी 6 जानेवारी 2020 रोजी तारखांची घोषणा करण्यात आली होती. कुठल्याही राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रक्रियेसाठी किमान 35 दिवसांचा कालावधी लागतो. अशास्थितीत 10 जानेवारीपर्यंत निवडणुकीची घोषणा केली जाणार असल्याचे मानले जात आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त होणार निवृत्त
निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार 18 फेब्रुवारी रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणूक 18 फेब्रुवारीपूर्वी करविण्यात येतील अशी दाट शक्यता आहे. निवडणूक आयुक्तांनी राजकीय पक्षांसमवेत सर्व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक यापूर्वीच घेतली आहे. तसेच समीक्षा बैठक देखील पार पडली असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.
आप-भाजप दरम्यान मुख्य चुरस
दिल्लीत होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्ष आणि भाजप यांच्यातच मुख्य लढत होणार असल्याचे मानले जात आहे. आम आदमी पक्ष मागील 10 वर्षांपासून दिल्लीत सत्तेवर आहे. अशास्थितीत आम आदमी पक्षाला सत्ताविरोधी भावनेला सामोरे जावे लागू शकते. तसेच काँग्रेसने या निवडणुकीकरता सर्व मतदारसंघांमध्ये उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतल्याने आम आदमी पक्षासमोरील आव्हान तीव्र झाले आहे. तर दुसरीकडे भाजपने केजरीवालांनाच लक्ष्य केल्याने पक्ष चाचपडत असल्याचे चित्र दिसून येत आहे.