साबालेन्का-रायबाकिना यांच्यात अंतिम लढत
वृत्तसंस्था/मेलबोर्न
2026 च्या ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत बेलारूसची आर्यना साबालेन्का आणि कझाकस्तानची रायबाकिना यांनी महिला एकेरीची अंतिम फेरी गाठली आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यात गुरूवारी साबालेन्काने युक्रेनच्या स्विटोलिनाचा तर रायबाकिनाने अमेरिकेच्या जेसिका पेगुलाचा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली आहे. गुरूवारी झालेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात साबालेन्काने स्विटोलिनाचा 6-2, 6-3 अशा सरळ सेटमध्ये फडशा पाडत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. या स्पर्धेमध्ये साबालेन्काने सलग चौथ्यांदा अंतिम फेरी गाठली आहे. आता तिचा अंतिम सामना येत्या शनिवारी कझाकस्तानच्या रायबाकिनाबरोबर होणार आहे.
महिला एकेरीच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात 26 वर्षीय तसेच पाचव्या मानांकीत रायबाकिनाने अमेरिकेच्या जेसिका पेगुलाचा 6-3, 7-6 (9-7) असा पराभव करत अंतिम फेरी गाठली. या सामन्यामध्ये सुरूवातीपासूनच रायबाकिनाने पेगुलावर दडपण आणण्यात यश मिळविले. पहिल्या सेटमध्ये रायबाकिनाने 4-2 अशी आघाडी घेतली. या सेटमध्ये तिने दोनवेळा पेगुलाची सर्व्हिस भेदली. रायबाकिनाने पहिला सेट 6-3 असा जिंकल्यानंतर पेगुलाने दुसऱ्या सेटमध्ये आपल्या क्रॉसकोर्ट फटक्यावर अधिक भर दिला. रायबाकिनाने या सेटमध्ये तिसऱ्या गेममध्ये पेगुलाची सर्व्हिस भेदत 2-1 अशी आघाडी घेतली. पण त्यानंतर पेगुलाने बेसलाईन खेळावर अधिक भर देत रायबाकिनाशी 5-5 अशी बरोबरी साधली. दरम्यान हा दुसरा सेट पेगुलाने टायब्रेकरपर्यंत लांबविला. टायब्रेकरमध्ये रायबाकिनाला गुण मिळविण्यासाठी पेगुलाने चांगलेच झुंजविले.
पण शेवटी रायबाकिनाने हा टायब्रेकर सेट 7-6 (9-7) असा जिंकून पेगुलाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आणले. रशियात जन्मलेल्या पण कझाकस्तानमध्ये स्थायिक झालेल्या रायबाकिनाने 2022 मध्ये विम्बल्डन ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर तिने यावेळी दुसऱ्यांदा प्रमुख स्पर्धेत अंतिम फेरी गाठली आहे. बेलारुसच्या टॉपसिडेड साबालेन्काने या स्पर्धेत गेल्या चार वर्षांच्या कालावधीत दोनवेळा अजिंक्यपद मिळविले असून आता ती यावेळी तिसऱ्यांदा जेतेपद मिळविण्यासाठी सज्ज झाली आहे. साबालेन्काने आतापर्यंत 5 ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत. ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम स्पर्धेत सलग चौथ्यांदा अंतिम फेरी गाठणारी साबालेन्का ही तिसरी महिला टेनिसपटू आहे. यापूर्वी असा पराक्रम 1971 ते 76 या कालावधीत इव्होनी कॉलेने तर 1997 ते 2002 या कालावधीत मार्टिना हिंगीसने केला होता.