For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कर्ले गावच्या जवानाला अखेरचा निरोप

12:50 PM May 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
कर्ले गावच्या जवानाला अखेरचा निरोप
Advertisement

लष्करी इतमामात अंत्यसंस्कार : अंत्यदर्शन घेण्यास पंचक्रोशीतील नागरिकांची गर्दी

Advertisement

वार्ताहर/किणये

अंबाला कँट हरियाणा येथून घरच्या कार्यक्रमासाठी महिन्याची सुटी घेऊन येताना उजैन गरोठ महामार्गावर कारची ट्रकला धडक बसून कर्ले गावच्या जवानाचा मृत्यू झाला. नायक रामचंद्र मोहन पाटील (वय 32) असे जवानाचे नाव असून सदर अपघात उज्जैन, झारडा येथील गरोठ महामार्गावर शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास घडला. यामुळे कर्ले गावावर शोककळा पसरली आहे. नायक रामचंद्र यांचे पार्थिव शनिवारी रात्री बेळगाव मिलिटरी हॉस्पिटल येथे आणण्यात आले. तर रविवारी सकाळी त्यांचे पार्थिव कर्ले गावात आणण्यात आले. त्यांच्या अंत्ययात्रेत पंचक्रोशीतील नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली. गावच्या या जवानाला नागरिकांनी साश्रूपूर्ण नयनांनी अखेरचा निरोप दिला. रामचंद्र हे अंबाला कँट हरियाणा येथे सेवा बजावीत होते. घरच्या कार्यक्रमानिमित्त एक महिन्याची सुटी घेऊन घरी येत होते. एक दिवस आधीच त्यांनी पत्नी श्रुती यांना विमानाद्वारे बेळगावला पाठविले होते. शुक्रवारी दुपारी गरोठ महामार्गावर कारची ट्रकला धडक बसून अपघातात ते जागीच ठार झाले. कारमध्ये असलेले त्यांचे मावस सासरे गोविंद पाटील हे किरकोळ जखमी झाले आहेत.

Advertisement

नायक रामचंद्र यांचा अपघातात मृत्यू झाल्याचे वृत्त ग्रामस्थांना समजताच शनिवारी दिवसभर ग्रामस्थ गावात ठाण मांडून बसले होते. शनिवारी रात्री मिलिटरी हॉस्पिटल येथे त्यांचे पार्थिव आणण्यात आले त्यानंतर रविवारी सकाळी नऊ वाजता त्यांचे पार्थिव कर्ले गावात आणले. यावेळी रामचंद्र यांचे पार्थिव पाहून आई-वडील, पत्नी, भाऊ-बहिणी यांनी एकच आक्रोश केला होता. रामचंद्र यांचे पार्थिव गावातील प्राथमिक मराठी शाळेच्या पटांगणात ठेवण्यात आले होते. यावेळी पंचक्रोशीतील नागरिकांनी त्यांचे अंतिम दर्शन घेतले. सजविलेल्या ट्रॅक्टरमधून गावातून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी नायक रामचंद्र पाटील अमर रहे अशा घोषणा नागरिकांनी दिल्या. पार्थिवावर ठिकठिकाणी पुष्प अर्पण करून अनेकजण आदरांजली वाहताना दिसत होते.

स्मशानभूमीत बाळकृष्ण पाटील, विनायक पाटील, आर. एम. चौगुले आदींची श्रद्धांजलीपर भाषणे झाली. प्रारंभी 640 ईएमई बटालियनचे कर्नल एच. एस. पौराणिक व त्यांच्या सहकाऱ्यांनी पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना दिली. त्यानंतर मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरतर्फे नायक सुभेदार संतोष येडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी मानवंदना दिली. कॅप्टन प्रीतम पाटील, किणये, कर्ले व परिसरातील विविध माजी सैनिक संघटना, विविध गावातील नागरिकांच्यावतीने पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरच्या जवानांच्या उपस्थितीत लष्करी इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे लहान भाऊ नामदेव यांनी भडाग्नी दिला. नायक रामचंद्र यांच्या पश्चात वडील, आई, पत्नी, भाऊ व बहीण असा परिवार आहे.

बंदुकीच्या तीन फैपरी झाडून मानवंदना

मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटलच्या जवानांनी यावेळी बंदुकीच्या तीन फैरी झाडून मानवंदना दिली. गावच्या जवानाला तिरंग्यात लपटलेला हा क्षण पाहताना उपस्थितांचे डोळे पाणावले होते.

आधी घर बांधणार नंतर लग्न...

रामचंद्र पाटील यांची घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. कठोर परिश्रम करून ते लष्करात रुजू झाले होते. चार वर्षांपूर्वीच आपण आधी घर बांधणार आणि त्यानंतर लग्न करणार असे ठरवून त्यांनी आधी घर बांधले. त्यानंतर स्वत: व आपल्या भावाचे लग्न केले. सहा महिन्यांपूर्वीच त्यांनी नवीन कार घेतली होती. याच गाडीतून येताना त्यांचा अपघात झाला.

Advertisement
Tags :

.