जेनिफर मोन्सेरात यांना अखेरचा निरोप
हिंदूपद्धतीने अंत्यसंस्कार, अनेक मान्यवरांची उपस्थिती
त. भा. प्रतिनिधी
पणजी : ताळगावच्या भाजप आमदार जेनिफर मोन्सेरात यांना सांत इनेज-पणजी येथील हिंदू स्मशानभूमीत हजारो लोकांच्या साक्षीने-गर्दीने अखेरचा निरोप देण्यात आला. त्यांच्या इच्छेनुसार हिंदूपद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे पती महसूलमंत्री बाबुश मोन्सेरात, मुलगे रोहित (पणजी महापौर), अमित आणि संपूर्ण मोन्सेरात कुटुंब उपस्थित होते. जेनिफर यांच्यावर सरकारी इतमामात अंत्यसंस्कार झाले. यावेळी राजकीय वर्तुळातील मान्यवर मंडळी, विविध राजकीय पक्षांचे नेते-पदाधिकारी यांची उपस्थिती होती.
पती बाबुश तसेच मुलगे रोहित, अमित यांनी जेनिफर यांच्या चितेला अखेरचा अग्नी दिला. पणजी मनपाचे नगरसेवक यावेळी उपस्थित होते. याप्रसंगी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. अंत्यसंस्काराची जागा फुलांनी सजवण्यात आली होती. ताळगाव येथील मोन्सेरात यांच्या निवासस्थानी काल सोमवारी सकाळपासूनच जेनिफर यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी लोकांनी, कार्यकर्त्यांनी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी नेते, आमदार, मंत्री, राज्यपाल तसेच मतदारांनी गर्दी केली होती. अनेकांनी फुले वाहून त्यांना आदरांजली-श्रद्धांजली वाहिली. ताळगाव कम्युनिटी हॉलपर्यंत भलीमोठी रांग लागली होती. त्यात प्रामुख्याने महिलावर्गाची संख्या जास्त होती.
गोव्याचे राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू, केरळचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, सहकारमंत्री सुभाष शिरोडकर, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, क्रीडामंत्री रमेश तवडकर, वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो, सार्वजनिक बांधकाममंत्री दिगंबर कामत, आमदार गोविंद गावडे, रुडॉल्फ फर्नांडिस, मायकल लोबो, प्रेमेंद्र शेट, डिलायला लोबो, भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, माजी मुख्यमंत्री लुईझिन फालेरो, चर्चिल आलेमाव, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, काँग्रेस कार्याध्यक्ष सुनिल कवठणकर, उत्पल मनोहर पर्रीकर व इतर अनेक मान्यवरांनी जेनिफर यांचे दर्शन घेऊन त्यांना पुष्पांजली अर्पण केली. विजयादेवी राणे यांनी हजेरी लावून जेनिफर यांना आदरांजली वाहिली. त्यांनी बाबुश, रोहित व मोन्सेरात कुटुंबियांचे सांत्वन केले.
सेंट मायकल चर्चमध्ये प्रार्थना
जेनिफर यांचे पार्थिव प्रथम ताळगावच्या निवासस्थानाहून सेंट मायकल चर्च येथे वाहनातून नेण्यात आले. तिरंगी ध्वजात व फुलांनी सजवलेल्या वाहनातून पार्थिव नेताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक हे जातीने हजर होते. आम आदमी पक्षाचे गोवा प्रदेशाध्यक्ष वाल्मिकी नाईक तसेच त्या पक्षाचे दोन्ही आमदार व्हेन्झी व्हिएगश व क्रूझ सिल्वा यांनी चर्चमध्ये हजेरी लावून जेनिफर मोन्सेरात यांना श्रद्धांजली दिली. तेथेही अनेक लोकांनी त्यांचे अंतिम दर्शन घेतले.
हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार
तेथून त्यांचे पार्थिव सांत ईनेज हिंदू स्मशानभूमीकडे नेण्यात आले. त्यावेळी असंख्य लोक अंत्ययात्रेत सामील झाले होते. डॉ. सावंत, दामू नाईक हे स्मशानभूमीपर्यंत अंत्ययात्रेत सहभागी झाले. त्याशिवाय इतर अनेक आजी-माजी आमदार, मंत्री, लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने स्मशानभूमीत उपस्थित होते. मुख्य सचिव डॉ. कंदवेलू यांनी स्मशानभूमीत बाबुश मोन्सेरात यांची भेट घेऊन त्यांचे व इतर कुटुंबियांचे सांत्वन केले. अंत्ययात्रेसाठी तसेच स्मशानभूमीत पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता. दिवसभर निवासस्थानी, चर्चमध्ये व स्मशानभूमीत त्यांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर शेवटी अखेरचा निरोप व अग्नी देताना अनेकजण भावूक झाले.
जनतेची सेवेकरी हरपली : बाबुश
ताळगावच्या मायकल चर्चमध्ये जेनिफर यांच्यासाठी प्रार्थनासभा झाली. त्यावेळी बोलताना मंत्री तथा जेनिफर यांचे पती बाबुश मोन्सेरात खूपच भावूक-सद्गदीत झाले. ते म्हणाले की, येणाऱ्या सर्व वर्षांत जेनिफर यांची उणीव भासत राहील. तिचे प्रेम, हास्य, आठवणी, उत्साह हे कायमच हृदयात राहणार आहे. ते आपण जपून ठेवणार असून तिची माणुसकी, जनतेसाठी केलेली सेवा चिरंतन स्मरणात राहणार असून तिने ताळगावच्या जनतेसाठी खऱ्या अर्थाने सेवा केली. जनतेची सेवेकरी आता या जगात नाही, असे त्यांनी शेवटी नमूद केले.