For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चित्ररथ मिरवणुकीबाबत बैठकीनंतरच अंतिम निर्णय

11:53 AM Apr 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
चित्ररथ मिरवणुकीबाबत बैठकीनंतरच अंतिम निर्णय
Advertisement

येत्या चार दिवसांत बैठकीचे आयोजन

Advertisement

बेळगाव : मुंबई, पुण्यानंतर सर्वात मोठी शिवजयंती चित्ररथ मिरवणूक बेळगावमध्ये काढली जाते. यावर्षी लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता असल्याने शिवजयंती मिरवणूक होणार की पुढे ढकलली जाणार, याबाबत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. यासाठी येत्या चार दिवसांत शिवजयंती महामंडळाची बैठक होणार असून त्यानंतर हे चित्र स्पष्ट होणार आहे. बेळगावात पारंपरिक पद्धतीने अक्षयतृतीयेच्या दुसऱ्या दिवशी शिवजयंती तर तिसऱ्या दिवशी सजीव देखाव्यांची चित्ररथ मिरवणूक काढली जाते. यावर्षी 10 मे रोजी अक्षयतृतीया असून 12 रोजी मिरवणूक काढली जाऊ शकते. बेळगावमध्ये 7 मे रोजी लोकसभा निवडणुका होणार असल्या तरी निकाल एक महिन्यानंतर म्हणजेच 4 जून रोजी जाहीर होणार आहे. निकालापर्यंत आचारसंहिता लागू असल्याने बेळगावमध्ये शिवजयंती चित्ररथ मिरवणूक नेमकी केव्हा होणार, याबाबत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे. चित्ररथ मिरवणुकीची तयारी महिनाभर आधीपासूनच केली जात असल्याने कार्यकर्त्यांनाही पुरेसा वेळ देणे गरजेचे आहे. शिवजयंती महामंडळाने शिवजयंती उत्सव मंडळांची बैठक घेण्याचे निश्चित केले आहे. बैठकीच्या परवानगीसाठी निवडणूक अधिकाऱ्यांकडे रितसर परवानगी मागण्यात आली आहे. परवानगी मिळताच येत्या चार दिवसांत शिवजयंती मिरवणुकीसंदर्भात व्यापक बैठक घेऊन त्यानंतरच चित्ररथ मिरवणुकीचा निर्णय जाहीर केला जाणार आहे. मिरवणुकीची तारीख लवकरच जाहीर करू, असे महामंडळाचे पदाधिकारी प्रकाश मरगाळे यांनी स्पष्ट केले आहे. मागीलवर्षी निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर 27 मे रोजी शिवजयंती चित्ररथ मिरवणूक झाली होती. यावर्षी 4 जूनला निकाल असून त्यानंतर मिरवणूक निश्चित केल्यास पावसाचे संकट असल्याने यातून मार्ग काढण्याची मागणी शिवजयंती मंडळांतर्फे होत आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.