मंत्र्यांच्या यादीवर आज अंतिम फैसला
पहिल्या टप्प्यात 10-12 जण शपथबद्ध होण्याची शक्यता
सिद्धरामय्या, शिवकुमारांकडून संभाव्य मंत्र्यांची यादी वरिष्ठांकडे सादर
► दिल्लीत आज मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासोबत चर्चेनंतर होणार निर्णय
त. भा. प्रतिनिधी
बेंगळूर :
माजी मुख्यमंत्री व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. पे. शिवकुमार हे बुधवार दि. 3 जून रोजी मुख्यमंत्रिपदी शपथबद्ध होणार आहेत. त्यांच्याबरोबरच 10 ते 12 आमदार मंत्रिपदाची शपथग्रहण करतील. त्यामुळे पहिल्या टप्प्यात मंत्रिमंडळात कोणाकोणाला स्थान द्यावे, यासाठी खलबते सुरू आहे. डी. के. शिवकुमार आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सोमवारी दिल्लीत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली असून मंगळवारच्या बैठकीत पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या उपस्थितीत मंत्र्यांच्या यादीला अंतिम स्वरुप दिले जाणार आहे.
मंत्रिपदासाठी काँग्रेसमधील अनेक इच्छुक आमदारांनी दिल्लीला धाव घेतली असून वरिष्ठांवर दबाव आणला आहे. दरम्यान, सोमवारी डी. के. शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांनी वेगवेगळ्या विमानाने दिल्लीला प्रस्थान केले. सिद्धरामय्या यांच्यासोबत माजी मंत्री के. जे. जॉर्ज, एच. सी. महादेवप्पा आणि एन. ए. हॅरिस हे देखील होते. दिल्लीत सिद्धरामय्या व शिवकुमार यांनी संभाव्य मंत्र्यांची यादी पक्षाचे राष्ट्रीय मुख्य सचिव के. सी. वेणुगोपाल यांच्याकडे सादर केली आहे. रात्री उशिरापर्यंत वेणुगोपाल आणि राज्य काँग्रेस प्रभारी रणदीप सुरजेवाला यांनी संभाव्य मंत्र्यांच्या यादीची पडताळणी करून चर्चा केली.
मंत्र्यांच्या निवडीसंदर्भात सोमवारी रात्री 9 वाजता काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या दिल्लीतील निवासस्थानी चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाणार होता. मात्र, ही बैठक मंगळवारपर्यंत पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे मंगळवारी सकाळी मल्लिकार्जुन खर्गे हे वेणुगोपाल, सुरजेवाला, डी. के. शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांच्याशी चर्चा करतील, त्यानंतर मंत्र्यांच्या निवडीचा अंतिम निर्णय घेतील.
ज्येष्ठ काँग्रेस नेते बी. के. हरिप्रसाद यांनाही महत्त्वाची जबाबदारी देण्याची चर्चा सुरू आहे. मात्र, याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. दुसरीकडे राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीच्या उमेदवारांसंदर्भातही मंगळवारी चर्चा होणार आहे.
कर्नाटक काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी कोणाला द्यावी, यावरही चर्चा होण्याची दाट शक्यता आहे. जर या पदाबाबत गोंधळ निर्माण झाला तर डी. के. शिवकुमार यांचा मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी कार्यक्रम पार पडल्यानंतर आणि राज्यसभा-विधानपरिषद निवडणुकीनंतर निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
उपमुख्यमंत्रिपदांविषयी चर्चा शक्य
सोमवारी दिल्लीत सिद्धरामय्या यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय मुख्य सचिव के. सी. वेणुगोपाल यांच्याकडे तीन उपमुख्यमंत्रिपदे निर्माण करण्याची मागणी केल्याचे समजते. या विषयावर देखील पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या उपस्थितीत मंगळवारी होणाऱ्या बैठकीत चर्चा होणार आहे.
संभाव्य मंत्री
सतीश जारकीहोळी
रामलिंगारे•ाr
डॉ. जी. परमेश्वर
के. जे. जॉर्ज
प्रियांक खर्गे
कृष्णभैरेगौडा
यु. टी. खादर
डॉ. यतिंद्र किंवा भैरती सुरेश
ईश्वर खंडे
एम. बी. पाटील
डॉ. एच. सी. महादेवप्पा