लालूप्रसाद यादव विरोधात अंतिम आरोपपत्र दाखल
लोकसभा निवडणूक संपताच सीबीआय अॅक्शन मोडमध्ये
वृत्तसंस्था/ पाटणा
लँड फॉर जॉब प्रकरणी लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या अडचणी कमी होण्याची चिन्हे नाहीत. सीबीआयने याप्रकरणी राजद अध्यक्ष लालूप्रसाद यादव आणि अन्य 77 आरोपींच्या विरोधात अंतिम आरोपपत्र दाखल केले आहे. आरोपींमध्ये लालूप्रसाद यांच्यासह राबडी देवी आणि तेजस्वी यादव यांचाही समावेश आहे. सीबीआयचे विशेष न्यायालय दाखल आरोपपत्रावर 6 जुलै रोजी सुनावणी करणार आहे. जमिनीच्या बदल्यात जमीन घोटाळ्याप्रकरणी न्यायालयाने 4 ऑक्टोबर रोजी माजी रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव, तेजस्वी आणि राबडी देवी तसेच अन्य आरोपींना जामीन मंजूर केला होता. सीबीआयनुसार लँड फॉर जॉब घोटाळ्याप्रकरणी दाखल दुसऱ्या आरोपपत्रात तत्कालीन रेल्वेमंत्री लालूप्रसाद, त्यांच्या पत्नी राबडी देवी, पुत्र तेजस्वी यादव, पश्चिम मध्य रेल्वेचे तत्कालीन महाव्यवस्थापक तसेच 19 जणांचा आरोपी म्हणून उल्लेख आहे. सीबीआयने मे 2022 मध्ये लालूप्रसाद यादव, राबडी देवी, कन्या मीसा, हेमा आणि अन्य काही जणांच्या विरोधात गुन्हे नोंदविले होते. रेल्वेमंत्री असताना लालूप्रसाद यांनी 2004-09 या कालावधीत रेल्वेच्या विविध झोन्समध्ये ग्रुप-डीच्या पदांवर नियुक्तीच्या बदल्यात स्वत:च्या कुटुंबीयांच्या नावावर उमेदवारांकडून जमिनीची मालकी हस्तांतरित करत आर्थिक लाभ मिळविला होता असा आरोप आहे. संबंधित नियुक्तींकरता कुठलीही जाहिरात किंवा सार्वजनिक माहिती जारी करण्यात आली नव्हती. तरीही पाटण्यातील रहिवाशांची नियुक्ती मुंबई, जबलपूर, कोलकाता, जयपूर आणि हाजीपूर येथील विविध रेल्वे स्थानकांवर करण्यात आली होती.