‘द वाइव्स’ चे चित्रीकरण सुरू
बॉलिवूडच्या स्टार पत्नींची कहाणी दिसणार
स्वत:च्या कहाण्यांद्वारे फॅशन अन् ग्लॅमर इंडस्ट्रीमागील कहाणी दाखविणारे दिग्दर्शक मधुर भांडारकर आता नवा चित्रपट घेऊन येत आहेत. या चित्रपटात ते बॉलिवूड सेलेब्सच्या पत्नींच्या कहाण्या दाखविणार आहेत. ‘द वाइव्स’ हा चित्रपट बॉलिवूडच्या सर्वात ग्लॅमरस महिलांमागे दडलेले सत्य समोर आणेल. या चित्रपटाचे चित्रिकरण सुरू झाले आहे.
द वाइव्स चित्रपटात सोनाली कुलकर्णी, मौनी रॉय, रेजिना कॅसंड्रा, राहुल भट्ट, सौरभ सचदेव, अर्जन बाजवा आणि फ्रेडी दारुवाला हे कलाकार मुख्य भूमिकेत असतील. द वाइव्सद्वारे मी समाजातील आणखी एक ग्लॅमरस आच्छादन हटवू इच्छितो आणि प्रत्यक्षात यामागे काय दडलेले आहे हे दाखवू इच्छितो. हा चित्रपट अशा महिलांची रहस्यं, संघर्ष आणि लवचिकतेवर एक बोल्ड अन् निर्भिड दृष्टीकोन सादर करेल, ज्या अनेकदा दिसुन येतात, परंतु त्यांच्याकडून फारच कमी ऐकले जाते असे मधुर भांडारकर यांनी म्हटले आहे. बॉलिवूड स्टार पत्नींच्या चमकदार जगताला अन् त्यामागील कहाणीला या चित्रपटात मांडले जाणर आहे. लाइमलाइटमागील सत्य समोर आणण्याचा उद्देश बाळगण्यात आला आहे. पीजे मोशन पिक्चर्सचे निर्माते प्रणव जैनसोबत मधुर भांडारकर यांचा हा दुसरा प्रोजेक्ट आहे. यापूर्वी दोघांनी ‘इंडिया लॉकडाउन’च्या नावाने ओटीटीवर एक चित्रपट आणला होता, त्याला मोठी पसंतीही मिळाली होती.