तृषाच्या नव्या चित्रपटाचे चित्रिकरण सुरू
राधिका सरतकुमार अन् अपर्णा बालमुरली मुख्य भूमिकेत
तृषा कृष्णन, राधिका सरतकुमार आणि अपर्णा बालमुरली लंडनमध्ये एका नव्या सायकोलॉजिकल हॉरर चित्रपटाचे चित्रिकरण करत आहेत. या चित्रपटाची कहाणी पूर्णपणे महिलांवर आधारित असणार आहे. यात तृषा, राधिका आणि अपर्णा या वेगवेगळ्या पिढ्यांच्या तीन दमदार अभिनेत्री म्हणून दिसून येणार आहेत.
या चित्रपटात केवळ भय अन् हॉरर दाखविण्याऐवजी सायकोलॉजिकल टेन्शन, रहस्य आणि वातावरणावर अधिक लक्ष दिले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. म्हणजेच प्रेक्षकांना चित्रपटात पारंपरिक हॉररसोबत रहस्य अन् मानसिक तणावाचाही अनुभव पहायला मिळेल.
या चित्रपटाद्वारे दिग्दर्शक राजा कृष्ण मेनन हे तमिळ चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहेत. राजा कृष्ण मेनन यांनी यापूर्वी ‘एअरलिफ्ट’, ‘शेफ’ आणि ‘पिप्पा’ यासारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन पेले आहे. या चित्रपटाद्वारे ते एका नव्या धाटणीच्या कथेचे दिग्दर्शन करणार आहेत. या चित्रपटाचे नाव, प्रदर्शनाची तारीख आणि कहाणीशी निगडित इतर माहिती अद्याप समोर आलेली नाही.