वेंगुर्ला-बेळगाव मार्गावरील खड्डे त्वरीत बुजवा
अन्यथा आंदोलन छेडणार ; कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवल्यास बांधकाम विभाग जबाबदार ; मंगेश तळवणेकर
सावंतवाडी । प्रतिनिधी
वेंगुर्ला-बेळगाव मार्गावरील कोलगाव तिठा ते बुर्डी पुल मार्गे दाणोली रस्त्यावरील मोठ्या प्रमाणात पडलेले खड्डे त्वरीत बुजवा, अशी मागणी माजी शिक्षण व आरोग्य सभापती मंगेश तळवणेकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता यांच्याजवळ निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात तळवणेकर यांनी म्हटले की, वेंगुर्ला बेळगाव रोड कोलगाव तिठा ते बुर्डी पुल मार्गे दाणोली हा संपुर्ण रस्ता खड्डेमय होऊन खराब झाला आहे. याचा वाहनचालकांना, रुग्णांना, पादचाऱ्यांना आणि विद्यार्थी वर्गाला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. गणेश चतुर्थी, दिवाळी सर्व सण गेले. परंतु या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम अद्यापही होताना दिसत नाही. हे खड्डे वाचविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना अपघातांना सामोरे जावे लागते आहे. त्यामुळे जिवीत व वित्त हानी होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे हे खड्डे 4 डिसेंबर पुर्वी बुजविण्यात यावेत , अन्यथा श्री देव विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व वाहन चालक व ग्रामस्थांना घेऊन 6 डिसेंबर रोजी बांधकाम कार्यालयासमोर उपोषण छेडण्यात येईल असा इशारा तळवणेकरांनी दिला. या उपोषणामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकामची राहील, असेही तळवणेकर यांनी म्हटले आहे.