कंत्राटदाराविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करा
प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांची मागणी
प्रतिनिधी/ पणजी
राष्ट्रीय महामार्ग 66 च्या दर्जाहीन कामामुळे पेडणे-मालपे येथील महामार्गाच्या बाजूला उभारण्यात आलेल्या संरक्षकभिंतीचा काही भाग काल कोसळला. या सर्वाला जबाबदार असलेल्या त्या कंत्राटदाराविरोधात मुख्यमंत्री डॉ.
प्रमोद सावंत फौजदारी गुन्हा दाखल करणार का, असा प्रश्न कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी उपस्थित केला आहे.
राष्ट्रीय महामार्ग 66 च्या दर्जाहीन कामाचा विषय मागील दोन वर्षांपासून कॉंग्रेस उपस्थित करीत आहे. परंतु त्याची दखल सरकारने घेतली नाही. राज्यातील असंवेदनशील सरकार गोमंतकीयांच्या जीवाशी खेळत असल्याची टीकाही त्यांनी केली. या राष्ट्रीय महामार्ग 66 चे काम करणारा कंत्राटदार सरकारी जावई बनला आहे. त्यामुळे त्याच्या विरोधात कारवाई करण्याचे धाडस सरकार दाखवणार का ?. बांबोळी ते पत्रादेवी महामार्गाच्या अत्यंत खराब बांधकामामुळे अनेक अपघात घडले असून यात काहींचा बळी गेला आहे. या महामार्गावर झालेल्या अपघातांची जबाबदारी केंद्रीय अवजड वाहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे घेणार का, या प्रश्नाचेही त्यांनी उत्तर द्यावे अशी मागणी पाटकर यांनी केली आहे.