राहुल सोलापूरकरवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा
सातारा :
छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही कुंटुब बघितले नाही. त्यांनी सर्व जाती धर्मातील लोकांना कुटुंब मानले. आज आपण लोकशाहीत वावरतो. ती लोकशाही, ते स्वातंत्र्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांमुळे आपल्याला मिळाले आहे. त्यांनी कधीही तत्वाशी तडजोड केली नाही. असे असताना दोन दिवसांपूर्वी अभिनेता राहुल सोलापूरकर हा बेताल वक्तव्य करतो. हा राहुल औरंगजेबाची औलादच म्हणावे लागेल, राहुलसारख्या वृत्तींना वेचून वेळीच ठेचलं पाहिजे, अशा शब्दात खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी अभिनेता राहुल सोलापूरकर याचा समाचार घेतला. दरम्यान, त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अभिनेता राहुल सोलापूरकर याने केलेल्या वक्तव्यावरुन सध्या तणाव निर्माण होवू घातला आहे. त्याच अनुषंगाने खासदार उदयनराजे यांनी दिल्लीत पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्या पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही स्वत:चे कुटुंब पाहिले नाही. त्यांनी सर्वच लोकांना, वेगवेगळया जातीधर्माच्या लोकांना आपले कुटुंब मानले. सर्वधर्मंसमभावाची शिकवण त्यांनी दिली. त्यांच्या विचारामुळे आज आपण ज्या लोकशाहीत वावरतो, आपल्याला स्वातंत्र्य मिळाले आहे, गुलामगिरीतून सुटका झाली तो विचार म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार. छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही तत्वाशी तडजोड केली नाही. असे असताना त्यांच्याबद्दल अनेकदा गलिच्छ विधाने केली जातात. दोन तीन दिवसांपूर्वी मी टीव्हीवर पाहिले. मलाच नाही तर सर्व शिवभक्तांना वेदना होतात. असे चुकीचे बेताल विधान अभिनेते राहुल सोलापुरकर याने केले आहे. राहुल सोलापूरकर तू आहेस तरी कोण, तू जे म्हणालास, लाच बिच काहीतरी शब्द वापरलास. त्या पलिकडे काही समजत नाही तुला. मी ऐकले होते की जिभेला हाड नसते. परंतु तु तर उचलतो जीभ अन् टाळ्यालाच लावतोस की रे. अशा लोकांच्या जिभा हासडल्या पाहिजेत. जे जे महापुरुषांबद्दल चुकीचे विधाने करतात त्या सगळयांना वेचून ठेचून काढले पाहिजे. अशी विकृती वाढली तर देशाच्या अखंडतेला धोका निर्माण होईल. या अगोदर आम्ही राज्य शासनाकडे आणि केंद्र विनंती केली आहे. पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटणार आहे. राहुल सोलापूरकर याच्यासारख्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, देशद्रोहाचा कायदा लागू केला, अशी त्यांनी मागणी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आपण जपले नाही तर देशाचे तुकडे व्हायला वेळ लागणार नाही. त्यामुळे यापुढे त्याचे चित्रपट किंवा त्याला अभिनयातून हद्दपार करा. त्याला कुठेही काम देवू नका. अशा लोकांना थारा दिला नाही पाहिजे, अशा शब्दात त्यांनी खडेबोल सुनावले.