विविध क्षेत्रातील लढवय्ये व्यक्तिमत्त्व हरपले
कॉ. कृष्णा मेणसे यांच्या निधनाबद्दल शोकसभा
बेळगाव : सीमा सत्याग्रह, कामगार चळवळ, स्वातंत्र्य चळवळ, गोवा मुक्ती आंदोलन, संयुक्त महाराष्ट्र चौक अशा विविध क्षेत्रातील लढवय्ये व्यक्तिमत्त्व हरपले, असे मत कॉ. कृष्णा मेणसे यांच्या निधनाबद्दल गुरुवारी तुकाराम महाराज भवनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या शोकसभेत अनेक मान्यवरांनी व्यक्त केले. व्यासपीठावर सुभाष ओऊळकर, अॅड. नागेश सातेरी, समितीचे प्रकाश मरगाळे, मालोजी अष्टेकर, मिलिंद रानडे, अनिसचे अनिल चव्हाण आदी उपस्थित होते. यावेळी मिलिंद रानडे म्हणाले, कॉ. कृष्णा मेणसे यांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेण्याबरोबर कम्युनिस्ट विचार स्वीकारला. शिवाय गोवा मुक्ती यासह विविध चळवळीमध्ये सक्रिय सहभाग घेतला.
कॉ. कृष्णा मेणसे अर्थात अप्पा यांच्या ज्ञान अणि कर्तव्याची बरोबरी करणारे व्यक्तिमत्त्व सापडणे अवघड आहे. एक साहित्यिक पत्रकार व सामाजिक राजकीय क्षेत्रात अप्पांचा दबदबा होता. त्याबरोबर समितीच्या प्रत्येक लढ्यात अप्पांनी स्वत:ला झोकून दिले होते. अशी विविध क्षेत्रे गाजविणारे व्यक्तिमत्त्व हरपल्याची खंत म. ए. समितीचे सरचिटणीस मालोजी अष्टेकर यांनी व्यक्त केली. आर. बी. पाटील म्हणाले, कॉ. कृष्णा मेणसे यांच्या रुपाने कामगार, कष्टकरी, दलित, वंचित, तळागाळातील जनतेचे प्रतिनिधीत्व करणारा एक झुंजार पत्रकार, साहित्यिक आणि कम्युनिस्ट पक्षाचा आधारस्तंभ हरपला आहे. मार्क्सवादी, गांधीवादी, सत्यशोधक, वंचित, असंघटित आणि शोषितांचे लढे पुढे घेऊन जाणे हीच खरी कॉ. कृष्णा मेणसे यांना श्रद्धांजली असल्याचे त्यांनी सांगितले.
समाजसेवक शिवाजी कागणीकर म्हणाले, सामाजिक राजकीय क्षेत्रात कॉ. कृष्णा मेणसे यांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. कष्टकरी कामगारांच्या लढ्यासाठी त्यांनी स्वत:ला झोकून दिले. अप्पा जरी आज निघून गेले असले तरी त्यांचे कार्य आणि विचार आपल्या पाठीशी कायम राहतील. यावेळी अॅड. नागेश सातेरी, सुभाष ओऊळकर, रणजित चव्हाण-पाटील, परशराम मोटराचे, संपत देसाई, शिवराज पाटील, महादेव चव्हाण, दत्ता नाडगौडा, डॉ. शोभा नाईक आदी मान्यवरांनी विचार व्यक्त केले. याप्रसंगी विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.