पाचवा खेटा ...कोल्हापूरकरांच्या आरोग्यासाठी
कोल्हापूर :
‘ज्योतिबाचा पाचवा खेटा... कोल्हापुरकरांच्या आरोग्यासाठी’ हा अनोखा उपक्रम कोल्हापूर वॉकर्स ग्रुप राबविणार आहे. यामध्ये रविवार दि. 16 रोजी श्री अंबाबाई मंदिर ते जोतिबा डोंगर असे पारंपारिक मार्गाने पायी चालत जाणार आहेत.
ट्रेकिंग केल्यामुळे उत्साह, आरोग्य, सकारात्मक मानसिकता, आत्मविश्वास, निसर्ग भ्रमंतीचा आनंद येतो. या सर्व गोष्टीचे फायदे आपल्या शरीराला होतात.
अशी चांगली सवय सर्वांना लागावी, हा उद्देश ठेवून कोल्हापूर वॉकर्स ग्रुपने 16 मार्च रोजी रविवारी होणारा पाच खेटा चालत पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘एक खेटा आरोग्यासाठी’ असे ब्रिदवाक्यही त्यांच्याकडून करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते या उपक्रमाला सुरवात होणार आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवडी, कोल्हापूर स्पोर्ट्स क्लबचे चेतन चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष धोंडीराम चोपडे, कार्याध्यक्ष नाना गवळी, उपाध्यक्ष परशुराम नांदवडेकर, सचिव महिपती संकपाळ,बाळासाहेब भोगम, अजितदादा मोरे, अरुणराव सावंत यांनी केले आहे.
- पाचव्या खेट्याचा मार्ग
अंबाबाई मंदिर महाद्वार चौक येथून 16 मार्च रोजी पहाटे ठीक 4 वाजून 30 मिनिटांने पाचव्या खेट्याला सुरुवात होणार आहे. अंबाबाई मंदिर-पापाची तिकटी -गंगावेश-शिवाजी पूल-वडणगे-कुशिरे मार्ग-गायमुख मार्गे जोतिबा डोंगर मंदिर येथे याची सांगता होणार आहे.