‘एचएसआरपी’साठी पाचव्यांदा मुदतवाढ
1 डिसेंबरपासून दंडात्मक कारवाईचा परिवहन खात्याचा निर्णय
प्रतिनिधी/ बेंगळूर
एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी केलेल्या वाहनांना हायसिक्युरिटी रजिस्टेशन प्लेट (एचएसआरपी) बसविण्याची मुदत राज्य सरकारने सोमवारी पुन्हा एकदा वाढविली आहे. त्यामुळे अद्याप एचएसआरपी नंबरप्लेट न बसविलेल्या वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारने यापूर्वी एचएसआरपीसाठी चारवेळा मुदत वाढविली तरी वाहन मालकांकडून नोंदणीसाठी म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. शिवाय नोंदणी केल्यानंतर अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर एचएसआरपी नंबरप्लेट उपलब्ध होत असल्याने नोंदणीकडे अनेकांनी दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे राज्य सरकारने पुन्हा एकदा मुदतवाढ दिली असून 30 नोव्हेंबरपर्यंत एचएसआरपी नंबरप्लेट बसविण्याचा आदेश दिला आहे. एखाद्या वेळेस 30 नोव्हेंबरपूर्वी हे नंबरप्लेट न बसविल्यास 1 डिसेंबरपासून दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय परिवहन खात्याने घेतला आहे. दुचाकी, चारचाकी, ऑटोरिक्षा यासह राज्यातील सर्व वाहनांना एचएसआरपी नंबरप्लेट बसविण्याची सक्ती केली आहे. फसवणूक आणि वाहनचोरीच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी ही उपाययोजना करण्यात आल्याचे राज्य सरकारने म्हटले आहे.