फिफा यू-17 वर्ल्ड कप : पोर्तुगालला विजेतेपद
ब्राझीलला नमवित इटलीने मिळविले तिसरे स्थान
वृत्तसंस्था/ दोहा, कतार
येथे झालेल्या फिफा यू-17 विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत पोर्तुगालने जेतेपद पटकावले. अंतिम लढतीत त्यांनी ऑस्ट्रियाचा 1-0 असा पराभव केला. 48 देशांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेतील पहिली तीन स्थाने युरोपियन संघांनी मिळविली. ब्राझीलला हरवून इटलीने तिसरे स्थान मिळविले.
बेनफिकाचा आघाडीवीर अनिसिओ काब्रालने गोलमुखाजवळ मिळालेल्या अॅक्रॉस पासवर रिकाम्या गोलपोस्टमध्ये चेंडू धाडत पोर्तुगालला आघाडी मिळवून दिली. 32 व्या मिनिटाला नोंदवलेला हा एकमेव गोल अखेर निर्णायक ठरला. या स्पर्धेतील काब्रालचा हा सातवा गोल होता. पण ऑस्ट्रियाच्या जोहान्स मोजरने 8 आठ गोल नेंदवल्याने त्याला गोल्डन बॉलचा पुरस्कार मिळाला. पोर्तुगालने हे यू-17 चे पहिले यश 20 व्या आवृत्तीत मिळविले. याआधी ही स्पर्धा दोन वर्षातून एकदा आयोजित केली जात असे. पण आता प्रतिवर्षी त्याचे आयोजन केले जात आहे. यावेळी कतारने त्याचे आयोजन केले होते आणि पुढील चार वर्षेही कतारमध्येच त्याचे आयोजन केले जाणार आहे.
अंतिम सामन्याआधी झालेल्या तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीत इटलीने ब्राझीलचा पेनल्टी शूटआऊटमध्ये 4-2 अशा गोलफरकाने पराभव केला. नियमित व जादा वेळेतही गोलशून्य बरोबरी कायम राहिल्याने पेनल्टी शूटआऊट घेण्यात आले. इटलीचा गोलरक्षक अलेसांड्रो लाँगोनीने दोन पेनल्टी वाचवल्यामुळे त्यांना तिसऱ्या क्रमांकाच्या या लढतीत यश मिळाले.