हद्दवाढ लादल्यास तीव्र लढा
कोल्हापूर :
शहरातील नागरिकांना पायाभूत सुविधा देण्यात महापालिका सपशेल फोल ठरत आहे. त्या तुलनेत गावांमध्ये 15 व्या वित्त आयोगातून भरघोस निधी मिळत असून विकासकामांचा सपाटा लागला आहे. त्यामुळेच शहरातील हद्दवाढीला विरोध आहे. त्यातूनही हद्दवाढ लादण्यासाठी शासकीय पातळीवर प्रयत्न झाल्यास खपवून घेणार नाही. 42 गावातील नागरिक या विरोधात तीव्र लढा उभा करतील, असा इशारा सर्व पक्षीय कोल्हापूर महापालिका हद्दवाढ विरोधी समितीचे अध्यक्ष तथा उचगांवचे सरपंच मधुकर चव्हाण, वडणगेचे माजी सरपंच सचिन चौगुले यांनी पत्रकार परिषदेतून दिला.
मधुकर चव्हाण म्हणाले, कोल्हापूर महापालिका हद्दवाढीला ग्रामीण जनतेचा विरोध असल्यामुळे 2017 मध्ये शहरालगत असलेली 42 गावांसाठी कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरण स्थापन करण्याचा शासननाचा निर्णय घेतला. परंतु आतापर्यंत प्राधिककरणाने 42 गावे विकसीत करण्यासाठी कोणताही निधी खर्च केलेला नाही. राज्यामध्ये अनके महापालिका शेजारी गावांकरिता प्राधिकरणे स्थापन करून गावे विकसित केली आहेत. परंतू राज्यशासनाने कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणला निधी उपलब्ध करुन दिलेला नाही. प्राधिकरणाच्या माध्यमातून नियोजनबद्ध, शाश्वत विकास करता येणार आहे. गावांचा विकास शहरासारखाच करणे शक्य होणार असून प्राधिकरणासाठी राज्य शासनाने 2 हजार कोटीचा निधी पहिल्या टप्यात देऊन ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधींचे हक्क अबाधित राहून शाश्वत विकास साधता येईल.
सचिन चौगुले म्हणाले, शहराची परिस्थिती पाहता 50 वर्षात कोणत्याही समाधानकारक मुलभूत सुविधा महापालिका नागरिकांना देऊ शकलेली नाही. त्याच्या या उणीवा शहरवासियांना रोजच्या जीवनांवर परिणाम करत आहेत. शहरामध्ये काही महिन्यापूर्वी 4 हजार 500 कोटींचा विकास निधी मिळाला. या कामांची उद्घाटने तत्कालिन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाली आहेत. कोल्हापूर शहरांचा विकास करण्यासाठी निधी मोठ्या प्रमाणात मिळत असेल तर प्राधिकरणामध्ये समाविष्ठ असलेल्या 42 गावांमध्ये एसटीपी, कचरा प्रकल्पासह विविध विकासकामांसाठी सुद्धा 2 ते 3 हजार कोटींचा निधी राज्य शासनाने देऊन या गावांचा शाश्वत विकास करावा. मनपामध्ये बांधकाम परवानगी सहज मिळत नाही. 25 हजार भरल्यानंतर पाणी कनेक्शन मिळते. यामुळेच हद्दवाढीला विरोध आहे. राज्यात सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, नगरविकास मंत्री यांना निवेदन देऊन कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाला निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी करणार आहे.
यावेळी महापालिकेकडून सर्व सुविधा मिळणारा एक प्रभाग दाखवून द्यावा, असाही सवाल कृती समितीच्या सदस्यांनी केला. शहरात कचरा, पाण्याचा प्रश्न आहे. रस्ते खराब आहेत. पंचगंगा प्रदूषण थांबलेले नाही. या उलट ग्रामिण भागात विकासकामे झाली आहेत. असे असताना शहरात येण्याची मानसिक्ता ग्रामस्थांची नसल्याचेही सांगण्यात आले. प्रथम शहरातील प्रश्न सोडवा आणि मग हद्दवाढीचा विचार करा, असेही काहींनी सांगितले.
पाचगावचे माजी सरपंच संग्राम पाटील, उजळाईवाडीचे सरपंच उत्तम आंबवडेकर, गांधीनगरचे सरपंच संदीप पाटोळे, सरनोबतवाडीचे किरण अडसुळ, वळीवडेचे रणजित कुसाळे, गडमुडशिंगीचे अरूण शिरगावे, मोरेवाडीचे अमर मोरे यांच्यासह 16 गावातील सरपंच व पदाधिकारी उपस्थित होते.
... म्हणूनच हद्दवाढीला विरोध
कोल्हापूर शहराचा सुनियोजित विकास करण्यात महापालिका अजून समक्ष नाही. त्यामुळे वाढीव हद्दीतील गावांचा विकास महानगरपालिका करु शकणार नाही. येथील उपनगरांची दयनिय अवस्था आहे, तीच आमच्या गावांची ही होणार आहे. म्हणून कोल्हापूर महानगरपालिका हद्दवाढीला तीव्र विरोधच राहणार आहे.