रशिया-युक्रेनमध्ये पुन्हा जोरदार संघर्ष
रशियाचा निवासी इमारतींवर मोठा हल्ला : प्रचंड विध्वंस
वृत्तसंस्था/कीव्ह
रशिया आणि युक्रेनमधील सुरू असलेले युद्ध आता अधिकच तीव्र होत चालले आहे. ताज्या हल्ल्यात रशियाने उत्तर युक्रेनमधील प्रिलुकी शहराला लक्ष्य केले. गुरुवारी रात्री झालेल्या या ड्रोन हल्ल्यात किमान पाच जणांना आपला जीव गमवावा लागला असून त्यात एका निष्पाप एक वर्षीय बालकाचाही समावेश आहे. यासोबतच, या हल्ल्यात अनेक लोक जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या हल्ल्यांपूर्वी काही काळापूर्वीच रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात दूरध्वनीवरून संभाषण झाले होते.
या चर्चेमध्ये रशियन विमानतळांवर झालेल्या हल्ल्यासाठी आम्ही युक्रेनला कोणत्याही किंमतीत प्रत्युत्तर देऊ, असे पुतिन यांनी स्पष्ट केले होते. गुरुवारी सकाळी प्रिलुकी येथील निवासी भागात शाहिद मालिकेतील सहा ड्रोनद्वारे हल्ला केल्यामुळे अनेक निवासी इमारतींचे गंभीर नुकसान झाले. हल्ल्याच्या काही तासांनंतर प्रादेशिक प्रमुख ओलेह सिनिहुबोव्ह यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘टेलिग्राम’वर यासंबंधी माहिती दिली. पूर्व युक्रेनच्या खार्किव्ह शहरात रशियन ड्रोन हल्ल्यात 17 जण जखमी झाले असून त्यात एक मूल, एक गर्भवती महिला आणि एक 93 वर्षीय वृद्ध महिला यांचा समावेश असल्याचे विभागीय गव्हर्नर व्याचेस्लाव चाउस यांनी गुरुवारी सांगितले.
दोन निवासी अपार्टमेंट लक्ष्य
वृत्तानुसार, ‘शाहिद’ ड्रोनने पहाटे 1:05 वाजता स्लोबिडस्की जिह्यातील दोन निवासी अपार्टमेंटना लक्ष्य केल्यामुळे तेथे आग लागली. या आगीत अनेक खासगी वाहने जळून खाक झाली. गेल्या आठवड्यात युक्रेनने मॉस्कोजवळील हवाई तळांसह प्रमुख रशियन लष्करी तळांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले केले. रशियन माध्यमांनुसार या हल्ल्यांमध्ये अनेक लष्करी विमाने आणि इंधन साठवणूक टाक्यांचे नुकसान झाले आहे. हल्ल्यानंतर युक्रेनने या कृतींना त्यांच्या संरक्षण धोरणाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून वर्णन केले आहे, तर राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी त्याला ‘युद्धासारखे पाऊल’ असे म्हटले आहे.
पुतिन यांचा इशारा
व्लादिमीर पुतिन यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांशी दूरध्वनीवरून संभाषण केल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन माध्यमांशी संवाद साधला. पुतिन खूप संतप्त दिसत आहेत. चर्चेची वेळ संपली असून आता थेट कारवाई केली जाईल. रशियामध्ये होणारे हल्ले आता कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाहीत, असा इशारा पुतिन यांनी दिल्यामुळे हा संघर्ष आता पूर्वीपेक्षा अधिक गंभीर आणि धोकादायक वळणावर पोहोचू शकतो, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.