इराणच्या राजधानीत भीषण संघर्ष
मुजाहिदीन-ए-खल्कचे 100 सदस्य ठार : सरकार समर्थकांनीही गमावला जीव
वृत्तसंस्था/ तेहरान
इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने (आयआरजीसी) मुजाहिदीन-ए-खल्कच्या 100 सदस्यांना ठार केल्याचा दावा केला आहे. मुजाहिदीन-ए-खल्क (एमईके) ही इराणमधील इस्लामिक प्रजासत्ताक सरकारच्या विरोधात सक्रीय आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या तेहरान येथील मुख्यालयानजीक या शिया-मार्क्सवादी गटाने संघर्ष केला होता.
एमईकेने स्वत:च्या मारले गेलेल्या तसेच जखमी सदस्यांची नावे आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेला देणार असल्याचे सांगितले आहे. आयआरसीजी आणि एमईकेदरम्यान हा संघर्ष मोताहारी कॉम्प्लेक्सनजीक झाला आहे. इराणचे मोताहारी कॉम्प्लेक्स तेहरान येथील एक अत्यंत संरक्षित सरकारी परिसर असून हे सर्वोच्च नेते खामेनेई यांच्या मुख्यालयाचे केंद्र आहे.
या कॉम्प्लेक्समध्ये खामेनेईंचे मुख्यालय, गार्डियन कौन्सिल, गुप्तचर मंत्र्याचे कार्यालय, न्यायपालिकेचे मध्यवर्ती कार्यालय, सुप्रीम नॅशनल सिक्युरिटी कौन्सिल आणि खामेनेईंचा पुत्र मोजतबा याचे कार्यालय अन् निवासस्थान आहे.
तेहरान येथे झालेल्या संघर्षात मारले गेलेल्यांमध्ये सरकारचे समर्थक अत्यंत धिक असल्याचा दावा एमईकेने केला आहे. या संघर्षाकरता थेट विदेशी गुप्तचर यंत्रणांनी सहाय्य केल्याचा दावाही एमईकेने केला आहे.
एमईकेला पहलवी राजघराण्याच्या शासनाच्या अखेरच्या वर्षांमध्ये दहशतवादी गट घोषित करण्यात आले होते. अली खामेनेई यांचे सरकारही याला दहशतवादी गट मानते.