धबधबे प्रवाहित होऊनही आंबोलीत पर्यटक कमीच
पर्यटकांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन पोलिसांसह वन कर्मचाऱ्यांनी गस्त
वार्ताहर /आंबोली
मुसळधार पावसामुळे वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या आंबोलीत धबधबे प्रवाहित झाले असले अद्याप पर्यटकांची वर्दळ सुरू झालेली नाही. पहिल्याच रविवारी पर्यटकांची म्हणावी तशी गर्दी नसल्याने व्यावसायिकांची निराशा झाली. मात्र, पर्यटकांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन पोलीस आणि वन कर्मचाऱ्यांनी गस्त वाढविली आहे. पावसाळ्यात धबधबे प्रवाही झाले की, पर्यटकांची पावले आपोआप आंबोलीकडे वळतात.परंतु यंदा सर्वत्रच पाऊस कमी असल्याने आणि तो उशिरा सुरू झाल्याने धबधबेही कमी प्रमाणात प्रवाहीत झाले आहेत. त्यामुळे रविवारी तुरळक प्रमाणात पर्यटक दिसत होते. फारसा पाऊस नसल्याने त्यांची निराशा झाली.
पर्यटकांची संख्या वाढेल, यासाठी पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता. आंबोली मुख्य धबधबा, सनसेट पॉईंट, पूर्वीचा वस देवस्थान, कावळेसाद पॉईंट या ठिकाणी पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. वाहतूक पोलीसही मुख्य धबधबा परिसरात तैनात करण्यात आले होते. आंबोली पोलीस दूरक्षेत्राची व्हॅन सर्व पाँईटवर पेट्रोलिंग करत होती. त्यामुळे सर्व ठिकाणची वाहतूक सुरळीत सुरू होती. तसेच कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. कावळेसाद पॉईंट, हिरण्यकेशी उगमस्थान, नांगरतास धबधबा आणि घाटातील मुख्य धबधबा परिसरात पर्यटकांची संख्या थोड्याफार प्रमाणात दिसत होती. श्रावणापूर्वीचे पाच शनिवार, रविवार शिल्लक असून त्यावेळी धंदा होईल या अपेक्षेवर हॉटेल व्यावसायिक व स्टॉलधारक आहेत. परंतु दरवर्षीच पावसाअभावी अपेक्षाभंग होताना दिसतो.