दीपोत्सवास प्रारंभ
आज वसुबारस : सर्वत्र होणार पशुधनाची पूजा : बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण
बेळगाव : वर्षभरात साजरा होणाऱ्या सर्व सणांचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तेजोमय दीपोत्सवास शुक्रवारपासून प्रारंभ होत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्साही व चैत्यन्यमय वातावरणात दिवाळी साजरी होणार असून त्या पार्श्वभूमीवर बाजारपेठही सज्ज झाली आहे. शुक्रवारपासून सर्वत्र दिव्यांचा लखलखाट होणार असून विद्युत रोषणाईने घरे उजळणार आहेत. शुक्रवारी वसुबारस अर्थात गोपूजनाने दिवाळी सणाला उत्साहात प्रारंभ होणार आहे. कृषीप्रधान असलेल्या भारत देशात पशुधनाचे महत्त्व मोठे आहे. भारतीय संस्कृतीत गाईला मातेचा दर्जा देण्यात आला असून, ती पूजनीय मानली गेली आहे.
तिच्याप्रतीच्या कृतज्ञतेतून वसुबारस या दिवशी गाय आणि तिचे वासरू यांची पूजा केली जाते. यंदा रमा एकादशीलाच वसुबारस साजरी होणार आहे. ज्या ठिकाणी गोमातेचे संरक्षण, संवर्धन होऊन तिचे पूजन होते त्या घराची तसेच राष्ट्राची भरभराट होते, असे सांगितले जाते. अशा या गोमातेच्या पूजनाने दीपोत्सवाला सुरुवात होते. यावर्षी शुक्रवारी 17 रोजी वसुबारस, शनिवार 18 रोजी धनत्रयोदशी आहे. 20 ऑक्टोबर रोजी नरक चतुर्दशी, 21 ऑक्टोबर रोजी मंगळवारी लक्ष्मीपूजन, 22 ऑक्टोबर रोजी दिवाळी पाडवा आणि 23 ऑक्टोबर रोजी भाऊबीज आहे. शुक्रवारी सकाळी वही खरेदी करण्यास चांगला मुहूर्त असून सायंकाळी साडेपाचनंतर गोमातेचे पूजन करून गोडा नैवेद्य खायला दिला जाणार आहे. यंदा दिवाळी सण आठवडाभर असणार आहे.
बाजारपेठेत खरेदीला उधाण
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर शहर व परिसरात उत्साही वातावरण असून बाजारपेठांमध्ये खरेदीला उधाण आले आहे. कपडे खरेदीला ग्राहकांची पसंती मिळताना दिसत आहे. बहुतांशी घरांमध्ये फराळाच्या साहित्याची खरेदी झाली आहे. घराघरांमध्ये फराळाचा खमंग वास दरवळत आहे. खरेदीवर यंदा महागाईचे सावट असले तरीही नागरिकांचा उत्साह दुणावला आहे. तऊणांमध्ये ऑनलाईन खरेदी कल असला तरीही स्थानिक विक्रेत्यांकडून खरेदी करण्याबाबत बऱ्यापैकी जागृती झाली असल्याने आणि जीएसटी दर घटल्याने त्याचा सकारात्मक परिणाम बाजारपेठेवर दिसून येत आहे.
21 ऑक्टोबर रोजी लक्ष्मीपूजन
दाते पंचांग, कालनिर्णय, महालक्ष्मी कॅलेंडर, महाराष्ट्रीय पंचांग नागपूर, निर्णयसागर, सोमण पंचांग, स्वामी समर्थ पंचांग तसेच भारतातील 100 पेक्षा अधिक पंचांगात आणि अन्य सर्व कॅलेंडरमध्येसुद्धा 21 ऑक्टोबर रोजी लक्ष्मीपूजन दिलेले आहे. तसेच आपण गेली अनेक वर्षे जे पंचांग किंवा कॅलेंडर वापरत आहात, त्यामध्ये दिल्याप्रमाणे सण-उत्सव साजरे करावेत, संभ्रम करून घेऊ नये.
- मोहन दाते, दाते पंचांगकर्ते